Video : बीड हा लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा जिल्हा, तिथून तुम्ही आला?; बजरंग सोनवणेंच्या उत्तराने भुवया उंचावल्या
देशाच्या संसद सभागृहात गेल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी बीडमधील जनतेचे आभार मानले. बीडच्या जनतेमुळेच मी संसद सभागृहात पोहोचल्याचं त्यांनी म्हटलं.
मुंबई : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर भाजपने बीड लोकसभा मतदारसंघातून यंदा पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे, बीड लोकसभा (Beed Loksabha) मतदारसंघात यंदा एकतर्फीच निवडणूक होईल, असे सुरुवातीला चित्र होते. मात्र, मराठा आरक्षणाचा तापलेला मुद्दा लक्षात घेऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बीडमधून बजरंग सोनवणेंना (Bajrang Sonavane) उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर, येथील प्रचारात जातीय रंग पाहायला मिळाला. अंत्यंत चुरशीच्या झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघात शेवटच्या फेरीपर्यंत मतमोजणीची उत्कंठा वाढली होती. अखेर बीडमधून पंकजा मुंडेंचा पराभव झाला अन् बजरंग सोनवणे 6 हजार मताधिक्य घेऊन विजयी झाले. त्यामुळे, बीडच्या जनतेने बजरंग सोनवणेंना संसदेत पाठवलं असं म्हणत बीडच्या जनतेपुढे मी नतमस्तक होतो, असे सोनवणे यांनी म्हटले. तर, बीड हा माझ्या जन्माच्या अगोदरापासून शरद पवारांचाच (Sharad Pawar) जिल्हा आहे, असेही त्यांनी म्हटले.
देशाच्या संसद सभागृहात गेल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी बीडमधील जनतेचे आभार मानले. बीडच्या जनतेमुळेच मी संसद सभागृहात पोहोचल्याचं त्यांनी म्हटलं. माझ्यासाठी आजचा दिवस अविस्मरणीय आहे, दिल्लीच्या सर्वोच्च सभागृहात जाण्याचा बहुमान मला मिळाला. माझ्या या सर्व मानाची मानकरी माझी बीड जिल्ह्यातील जनता आहे, ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या जनतेचे मी नतमस्तक होऊन आभार मानतो, असे सोनवणे यांनी दिल्लीतील पहिल्या दौऱ्यावर बोलताना म्हटले.
बीड हा शरद पवारांचा जिल्हा
यावेळी, लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा बीड हा मतदारसंघ आहे, त्याच बीड लोकसभा मतदारसंघातून तुम्ही संसद सभागृहात आला आहात, काय सांगाल?,असा प्रश्न बजरंग सोनवणेंना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा बीड जिल्हा म्हणून माझ्या जन्माच्या अगोदरपासून बीड जिल्हा ओळखला जातो, आणि तो पवारसाहेबांचाच जिल्हा आहे, असे उत्तर सोनवणे यांनी दिले.
आईच्या नावासह घेतली शपथ
मी बजरंग सत्वशीला मनोहर सोनवणे... अशी सुरुवात करुन संसद सभागृहात शपथ घेतली. तर, जय शिवराय, जय किसान, जय महाराष्ट्र असे म्हणत आपल्या शपथेचा समारोप केला. बीड जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी म्हणून बजरंग सोनवणे संसदेत पोहचले आहेत. त्यामुळे, साहजिक बीडमधील राजकारणाचा उल्लेख निघताच दिवंगत नेते आणि माजी केंद्रीयमंत्री गोपनाथ मुंडे यांचा उल्लेख आल्याशिवाय राहत नाही. त्याच अनुषंगाने बजरंग सोनवणे यांना दिल्लीत पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर, बजरंग सोनवणे यांनी दिलेल्या उत्तराने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आयोगाने पिपाणी चिन्ह रद्द करावं
ग्रामीण भागातील आमच्या मतदार बंधुंना गोंधळात टाकणारं हे चिन्ह आहे. कारण, आमचं चिन्ह तुतारीधारी माणूस आहे. तर, पिपाणी हे चिन्ह तुतारी नावानेच आयोगाकडे आहे. या पिपाणी चिन्हामुळे साताऱ्यातील आमच्या उमेदवाराचा पराभव झाला. कारण, विजया उमेदवारापेक्षा पिपाणीला जास्त मतदान मिळालं आहे, तर माझ्या मतदारसंघातही 50 हजारांपेक्षा जास्त मतदान पिपाणी या चिन्हाने घेतलं आहे. त्यामुळे, हे चिन्ह बाद केलं पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. या मागणीवर आपणही आग्रही असल्याचं सोनवणे यांनी म्हटलं.
हेही वाचा
शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत विधानसभेच्या 6 जागा लढवणार; 'या' महत्त्वाच्या मतदारसंघांवर दावा