शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत विधानसभेच्या 6 जागा लढवणार; 'या' महत्त्वाच्या मतदारसंघांवर दावा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबईत विधानसभेला 6 पेक्षा जास्त जागा लढवण्याच्या तयारीत आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता राज्यात मिशन विधानसभा (Vidhansabha) सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपात झालेला उशीर महायुतीसाठी डोकेदु:खी ठरल्याने आता विधानसभेसाठी लवकरच जागावाटप करण्याची योजना महायुतीच्या सर्वच पक्षांकडून आखली जात आहे. तर, महाविकास आघाडीला मिळालेल्या घवघवतीत यशामुळे महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) पक्षांचा आणखी समन्वय साधत आगामी विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याचा प्लॅन आहे. यापूर्वीच, महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत, निवडून येणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य असा क्रम महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षात राहिल, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले होते. दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीनेही राज्यात 100 जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे, त्यात मुंबईतील 6 पेक्षा जास्त जागा लढवण्याचा निर्धार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबईत विधानसभेला 6 पेक्षा जास्त जागा लढवण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांनी एबीपी माझाला यासंदर्भात माहिती दिली. विशेष म्हणजे मुंबईतील कोणत्या जागांवर राष्ट्रवादी इच्छुक आहे, हेही त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस लढवू इच्छित असलेल्या मतदारसंघांमध्ये मलबार हिल, भायखळा, विक्रोळी, सायन-कोळीवाडा,अनुशक्ती नगर-कुर्ला, दिंडोशी-वर्सोवा, अंधेरी पश्चिम, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि शिवाजीनगर-मानखुर्द यांपैकी किमान 6 जागा महाविकास आघाडीतील जागावाटपात मागण्याची शक्यता आहे. राखी जाधव लवकरच शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन मुंबईतील विधानसभेच्या जागांचा प्रस्ताव सादर करणार आहेत.
मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघापैकी महाविकास आघाडीला 4 लोकसभा मतदारसंघात विजय मिळाला आहे. त्यामुळे,महाविकास आघाडीच्या आमदार व पदाधिकाऱ्यांचाही उत्साह वाढला आहे. मुंबईतील मुंबई उत्तर-पश्चिम आणि उत्तर मुंबई या दोनच मतदारसंघात महायुतीला विजय मिळाला आहे. मुंबई उत्तर-पश्चिममधून रवींद्र वायकर आणि उत्तर मुंबईतून पियुष गोयल यांनी विजय मिळवला आहे. मुंबईतील उर्वरीत चारही मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना यश मिळाले आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ असा आकडा लक्षात घेतला असता, मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात एकूण विधानसभेच्या 36 जागा आहेत. त्यापैकी, 6 पेक्षा जास्त जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने मागणी केली आहे. त्यामुळे, उर्वरीत जागा ठाकरेंच्या शिवसेना आणि काँग्रेसला सोडल्या जातील. त्यामुळे, नेमकं किती व कोणत्या जागा कोणत्या पक्षाला मिळतील, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.