(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik: नाशिकच्या चार तालुक्यात पाणी टंचाई रोखण्यासाठी महत्वाचा निर्णय, गुलाबराव पाटील म्हणाले....
Nashik: नाशिक जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर पाणी पुरवठा योजनांचे आज ई- भूमीपूजन झाले आहे.
Nashik: बारामती तालुक्याच्या धर्तीवर सुरगाणा, पेठ, कळवण व मालेगांव या ठिकाणी भूमिगत साठवण टँकस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात या टँकसमध्ये पाणी साठवण करून त्याचा उपयोग उन्हाळ्यात करण्यात येईल, असे प्रतिपादन मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी केले.
मंत्री गुलाबराव पाटील आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर होते. यावेळी जिल्ह्यातील विविध भागांतील पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. नाशिक जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर पाणी पुरवठा योजनांचे आज ई- भूमीपूजन झाले आहे. या मंजूर योजनांची कामे ग्रामपंचायतींनी जलद गतीने पूर्ण करावीत. गतीने व दर्जेदार काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना जलदूत पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
यावेळी ते म्हणाले की, जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून आपल्या दारापर्यंत नळाद्वारे पाणी येणार आहे. परंतु पाणी जपून वापरणे ही काळाजी गरज आहे. पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचतीचे नियोजन प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील 1320 योजनांचे 2560 कोटी रूपयांच्या कामांचे आज भूमिपूजन झाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जलजीवन अतंर्गत कामांच्या व्याप्तीसह व त्यास लागणारा निधीही आपणास उपलब्ध झाला आहे.
तसेच गावातील सरपंच, ग्राम प्रतिनिधी यांनी लोकसहभागातून व एकोप्याने ही कामे पूर्ण करावयाची आहेत. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे. त्या ठिकाणी आरओ प्लॅान्टसची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठीचे प्रस्ताव ग्रामपंचायतींनी त्वरीत सादर करावेत. बारामती तालुक्याच्या धर्तीवर सुरगाणा, पेठ, कळवण व मालेगांव या ठिकाणी भूमिगत साठवण टँकस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात या टँकसमध्ये पाणी साठवण करून त्याचा उपयोग उन्हाळ्यात करण्यात येईल. विहिरींच्यालगत शोषखड्डे तयार करून त्यात सांडपाणी जमिनीत जिरवले गेले तर निश्चितच विहिरींच्या पाण्याची पातळी वाढणार असल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली. जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कार्य स्तुत्य असल्याचे कौतुकही मंत्री पाटील यांनी यावेळी केले.
पाणी हा महिलांचा जिव्हाळ्याचा प्रश्न...
पालकमंत्री दादा भुसे यावेळी म्हणाले की, पाणी हा महिलांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. जलजीवन योजनांच्या माध्यमातून महिला भगिनींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा खाली उतरणे हे अत्यंत पवित्र काम होणार आहे. भविष्याच्या दृष्टीने पाण्याचे उत्तम स्त्रोत गावात तयार झाले पाहिजेत. गावातील ज्येष्ठ मंडळींचे मार्गदर्शन व सहभाग या कामांमध्ये वाढल्यास पाण्यांच्या स्त्रोताची स्थळे निश्चित करण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यात काही भागात पाऊस जास्त पडतो. परंतु साठवणीसाठी पर्यायी स्त्रोत नसल्यामुळे अशा भागात टँकर्सची आवश्यता भासते. अशा ठिकाणी पाणी जमिनीतील टाक्यांमध्ये साठवण करून, त्याचप्रमाणे साठवण तलाव व शेततळे तयार केल्यास याचा उपयोग निश्चितच टंचाईच्या काळात होऊ शकेल. जिल्ह्यात सौर प्रकल्प उभारणी करून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या पथदिपांचे वीजबील एकाच ठिकाणी रूपांतरीत करता येईल, असा प्रकल्प जिल्हा नियोजनच्या माध्यमातून प्रस्तावित असल्याची माहिती यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी दिली.
नाशिक जिल्ह्यात इतक्या योजना मंजूर...
जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे जलजीवन मिशन अंतर्गत एकूण 15 तालुक्यांत 1282 योजना असून यात एकूण समाविष्ट गावे 1356 असून मंजूर कामांची एकूण किंमत रूपये 1443.05 कोटी इतकी आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ नाशिक जलजीवन मिशन अंतर्गत 24 योजना मंजूर आहे. यात एकूण 302 गावे समाविष्ट असून मंजूर योजनांची एकूण किमंत रूपये 94326.47 लक्ष इतकी आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन विभाग नाशिक अंतर्गत 14 योजना मंजूर आहेत. यात एकूण 106 गावे समाविष्ट असून योजनांच्या एकूण कामांची किमंत रूपये 17408.47 लक्ष इतकी आहे.