''राजर्षी शाहू महाराजांना अभिप्रेत काम नरेंद्र मोदी करतायत''; जनक घराण्याचे वंशज समरजीतसिंह घाटगेंचा पलटवार
कोल्हापुरात शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपानेही मान देऊ गादीला, मत देऊ गादीला असा प्रचार सुरू केला आहे. तर, शिवसेना नेते व मंत्री उदय सामंत यांनीही आज छत्रपती संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीवेळी काय घडलं, याचा गौप्यस्फोट केला
कोल्हापूर : महाराष्ट्रातील छत्रपतींच्या वंशजांची मानाची गादी असलेल्या कोल्हापूर (Kolhapur) आणि साताऱ्याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही मतदारसंघात छत्रपतींच्या घराण्यातील वारसदार मैदानात उतरले आहेत. कोल्हापूरमधून शाहू महाराज (Shahu Maharaj) महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. तर, साताऱ्यातून खासदार उदयनराजे भोसले महायुतीचे उमेदवार आहेत. मात्र, कोल्हापूरात गादी विरुद्ध मोदी असा राजकीय सामना रंगला आहे.स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) कोल्हापुरातील महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेऊन महायुतीचा उमेदवार निवडून देण्याचं आवाहन केलं. त्यामुळे, कोल्हापुरातील लढाई ही प्रतिष्ठेची झाली असून छत्रपतींच्या घराण्यातील जनक वारसदार समरजीतसिंह घाटगे यांनीही मोदींच्या सभेनंतर आपली भूमिका स्पष्ट करताना मोदींचं कौतुक केलंय. विशेष म्हणजे राजर्षी शाहू महाराजांना अभिप्रेत असं काम नरेंद्र मोदी करत असल्याचं घाटगे यांनी म्हटलं.
कोल्हापुरात शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपानेही मान देऊ गादीला, मत देऊ गादीला असा प्रचार सुरू केला आहे. तर, शिवसेना नेते व मंत्री उदय सामंत यांनीही आज छत्रपती संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीवेळी काय घडलं, याचा गौप्यस्फोट केला. छत्रपतींच्या गादीचा आणि महाराजांच्या वंशजांचा सन्मान आम्ही करतो, पण तत्कालीन शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून संभाजीराजेंचा अपमान करण्यात आल्याचं सामंत यांनी म्हटलं. त्यामुळे, भाजपाकडून व महायुतीकडून छत्रपतींच्या वारसांच्या उमेदवारीविरुद्ध त्याच मुद्द्यांना अनुसरुन प्रचार सुरु केल्याचं दिसून येते. त्यातच, राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वारसदार समरजीसिंह घाटगे यांनीही मोदींचं कौतुक केलं आहे.
मोदी शाहू महाराजांच्या कार्याचा वारसा पुढे नेत आहेत
राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराचा आणि कार्याचा वारसा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे नेत आहेत असं शाहू जनक घराण्याचे वंशज आणि भाजप नेते समरजीतसिंह घाटगे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शाहू महाराज यांना पराभूत करण्यासाठी कोल्हापुरात आले होते, अशी टीका महाविकास आघाडी कडून सुरू आहे. विरोधकांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना समरजितसिंह घाटगेंनी मोदींचं कौतुक केलं. आताच्या घडीला राजर्षी शाहू महाराजांना अभिप्रेत असलेलं काम नरेंद्र मोदी करत आहेत. महिलांचा सन्मान, 370 कलम हटवणे, सर्वांना शिक्षणाची संधी ही सगळी कामं नरेंद्र मोदी करत आहेत. त्यामुळे कोल्हापूर मधील लोकसभा निवडणूक ही दोन व्यक्तींमधील नसून दोन विचारांमधील असल्याचे देखील समरजितसिंह घाटगेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, समरजीत घाटगे हे भाजपासोबत असून महायुतीच्या उमेदवारासाठी ते प्रचाराच्याही मैदानात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाल्यानतंर समरजीत घाटगेंनीही विरोधकांना प्रत्युत्तर दिल्याने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा शाहू महाराजांच्या गादीचं होत असलेलं राजकारण उघड झालं आहे.
हेही वाचा
राज्यसभा निवडणुकीत छ. संभाजीराजेंचा अपमान कुणी केला? 2 व्हिडीओ दाखवत उदय सामंतांचा गौप्यस्फोट!