मोठी बातमी : नारायण राणे भ्रष्ट मार्गाने विजयी, खासदारकी रद्द करा, ठाकरेंच्या उमेदवाराची थेट निवडणूक आयोगाला नोटीस
निवडणूक प्रचार कालावधी 5 मे 2024 रोजी संपलेला असतांनाही भाजप कार्यकर्ते 6 मे रोजी देखील नारायण राणे यांचा प्रचार करीत होते, असा आरोप नोटीसमध्ये आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात लक्षवेधी ठरलेली कोकणतील निवडणूक (Election) आता आरोप प्रत्यारोपांमुळे पुन्हा चर्चेत आहे. येथील निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी विजय मिळवला. मात्र, नारायण राणेंची (Narayan Rane) खासदारकी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण तातू राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर 5 वर्ष निवडणुक लढविण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात यावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाते नेते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri-Sindhudurg) मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केली आहे. याबाबत, अॅड. असीम सरोदे, अॅड. किशोर वरक ,अॅड. श्रीया आवले यांच्यामार्फत कायदेशीर नोटिसही विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेली आहे.
निवडणूक प्रचार कालावधी 5 मे 2024 रोजी संपलेला असतांनाही भाजप कार्यकर्ते 6 मे रोजी देखील नारायण राणे यांचा प्रचार करीत होते, नारायण राणे समर्थक प्रचार संपलेला असतांनाही ई.व्ही.एम.मशीन दाखवून राणे साहेबांनाच मत द्या, असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्याचे या नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे. नारायण राणे यांचे पुत्र आमदार नीतेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले, “जर राणे साहेबांना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाली नाही तर आमच्याचकडेच निधी मागायला यायचं आहे. त्यामुळे तेव्हा लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधी सुद्धा मिळणार नाही अशी धमकी 13 एप्रिल रोजी झालेल्या सभेत नितीश राणे यांनी दिली, त्याचाही उल्लेख या नोटिसमध्ये करण्यात आलेला आहे.
निवडणूक आचार संहितेचा नारायण राणे, नितेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी भंग केलेला आहे. त्यामुळे लोकशाहीची फसवणूक करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या विजयाची निवडणूक आयोगने चौकशी करावी, अशी विनंती विनायक राऊत यांनी या कायदेशीर नोटिसमधून केलेली आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भाजपला मदत - सरोदे
केंद्रीय निवडणुक आयोगाने 07 दिवसात या नोटिसवर उत्तर द्यावे अशी अपेक्षा आहे. तसेच भ्रष्टाचाराचा वापर करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या निवडून येण्याला उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करून आव्हान करण्यात येईल, असेही माजी खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. अनेक ठिकाणी मोकळ्या व पारदर्शक वातावरणात मतदान व मतमोजणी झाली नाही. निवडक पद्धतीने भ्रष्टाचार करू देणे, भाजपच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार व बेकायदेशीरतेकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार काही निवडणुक निर्णय अधिकार्यांच्या मदतीने करण्यात आलेत हे वास्तव लोकशाही यंत्रणेचा गैरवापर दाखविणारे आहेत व त्याबाबत नागरिक म्हणून भारतावर प्रेम करणार्या प्रत्येकाने चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिती असल्याचे अॅड. असीम सरोदे यांनी म्हटले म्हणाले.