Mumbai News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज
Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर सकाळी साडे दहा वाजता शरद पवार मुंबईतील आपल्या सिल्वर ओक या निवासस्थानी रवाना झाले.
Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना आज मुंबईतील (Mumbai) ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून (Breach Candy Hospital) डिस्चार्ज मिळाला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर सकाळी साडे दहा वाजता शरद पवार मुंबईतील आपल्या सिल्वर ओक या निवासस्थानी रवाना झाले. शरद पवारांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती माहिती डॉ. प्रतीत समदानी यांनी 'एबीपी माझा'ला दिली होती. मागील आठ दिवसांपासून शरद पवार यांच्यावर ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरु होते.
प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांना 31 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात तीन दिवस उपचार घेतल्यानंतर शरद पवार यांना डिस्चार दिला जाणार होता. परंतु प्रकृतीत फारशी सुधारणा झाल्याने त्यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला होता. अखेर आज आठ दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
हाताला बँडेज, चेहऱ्यावर थकवा तरीही शरद पवार यांची शिबिरात हजेरी, कार्यकर्त्यांना म्हणाले...
उपचार सुरु असतानाही शिर्डीतील पक्षाच्या शिबिराला हजेरी
दरम्यान, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरु असताना देखील शरद पवार यांनी शिर्डी येथील पक्षाच्या शिबिरात हजेरी लावली होती. शरद पवार शनिवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांच्या पथकासह विशेष हेलिकॉप्टरने शिर्डी इथे पक्षाच्या शिबिरासाठी दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी उत्साहात त्यांचं स्वागत केलं. तर, शिबिराच्या स्थळी दाखल झाल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणांच्या निनादात पवार यांचं स्वागत केलं. यावेळी शरद पवार यांच्या हाताला बँडेज असल्याचे दिसून आलं होतं. तर चेहऱ्यावर आजारपणामुळे थकवा दिसून येत होता. पवार यांनी पाच मिनिटं कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी पवार यांचं भाषण वाचून दाखवलं.
मुख्यमंत्र्यांकडून शरद पवारांची भेट
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 4 नोव्हेंबर रोजी शरद पवार यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. एकनाथ शिंदे ४ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात पोहोचले आणि त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले होते की, "शरद पवार यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो. शिर्डीतील शिबिराहून परतल्यानंतर चाचण्या, तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल."
शरद पवारांवर गेल्या वर्षी शस्त्रक्रिया
मागील वर्षी मार्च महिन्यात शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पोटदुखीच्या त्रासामुळे त्यांना 30 मार्च रोजी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पित्ताशयात खडे तयार झाल्याने त्यांच्या पोटात दुखत असल्याचं निदान झालं होतं. नंतर एन्डोस्कोपीद्वारे त्यांच्या पित्ताशयातील खडे काढण्यात आले.