मुंडे बहिण-भाऊ अन् शरद पवारांना 'राज'कीय चॅलेंज; बीडमधील 6 मतदारसंघात मनसेचे उमेदवार
बीड जिल्हा हा मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदु राहिल्याने या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकांवेळी वेगळेच रंग पाहायला मिळाले. भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला
मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला असून मनसेच्या 4 उमेदवारांची घोषणाही केली. सोलापूर दौऱ्यातून राज यांनी आपल्या मराठवाडा दौऱ्याला सुरुवात केली. मात्र, मराठवाड्यात प्रवेश करताच धाराशिव (Dhrashiv) जिल्ह्यात राज ठाकरेंना मराठा आंदोलकांनी विरोध केला होता. त्यावेळी, आंदोलकांशी चर्चा करुन राज ठाकरेंनी आपली भूमिकाही त्यांना समाजावून सांगितली होती. तर, सोलापूर दौऱ्यात पहिल्याच दिवशी मनसेच्या दोन उमेदवारांची विधानसभा निवडणुकांसाठी घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर, लातूर आणि हिंगोली विधानसभा (Vidhansabha) मतदारसंघातूनही राज ठाकरेंनी मनसेच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. आता, राज ठाकरेंनी बीड (Beed) जिल्हा दौऱ्यात बीडमध्ये 6 विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे जिल्हाध्यक्षानी याबाबत माहिती दिली.
बीड जिल्हा हा मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदु राहिल्याने या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकांवेळी वेगळेच रंग पाहायला मिळाले. भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे यंदा त्यांचे भाऊ धनंजय मुंडे हेही त्यांच्यासमवेत असताना मुंडेचा पराभव झाल्याने आश्चर्य वक्त होत आहे. त्यातच, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्याने आपणही विधानसभेची तयारी करत असल्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे इच्छुक उमेदवारांना तयार राहण्याचेही जरांगे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे, बीडमध्ये यंदा तिरंगी लढत होणार असल्याचे दिसून येते. त्यातच, आता मनसेनंही बीडमध्ये शड्डू ठोकला असून 6 मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, बीडमध्ये मुंडे बंधु-भगिनी व शरद पवारांच्या राष्ट्रवादीला राजकीय चॅलेंज दिलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा निहाय मतदारसंघाचा आढावा घेत निवडणूक लढणार असल्याचा निर्धार केला आहे. या अनुषंगाने राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत. बीडमध्ये झालेल्या बैठकीतून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी एकला चलो रे चा नारा दिलाय. त्याच अनुषंगाने कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. तर येत्या पंधरा दिवसात जे कार्यकर्ते इतर पक्षातून येणार, त्यांना पक्षप्रवेश देणार असल्याची देखील चर्चा या बैठकीत झाली आहे. त्यामुळे, बीड जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात राज ठाकरेंकडून उमेदवार देण्यात येणार असल्याचे समजते.
दरम्यान, मनसेनं मुंबईतील शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर आणि पंढरपूर मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, लातूरमधून संतोष नागरगोजे आणि हिंगोलीतून बंडू कुटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आत्तापर्यंत मनसेचे 4 उमेदवार जाहीर झाले आहेत. आता, बीडमध्ये 6 मतदारसंघात तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील 6 उमेदवार कोण, हा प्रश्न अद्याप कायम आहे.
हेही वाचा
बीडमध्ये सुपारी फेकणारे 8 जण ताब्यात; पोलीस अधीक्षकांना राज ठाकरेंचा सवाल, इंटेलिजन्स नाही का?