Raj Thackeray: राज ठाकरेंची तोफ कोकणात धडाडणार? नारायण राणेंच्या प्रचारासाठी सिंधुदुर्गात सभा घेण्याची शक्यता
Maharashtra Politics: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे विनायक राऊत आणि भाजपचे नारायण राणे यांच्यात सामना होत आहे. नारायण राणे यांनी धडाक्यात प्रचार सुरु केला आहे. आता त्यांना राज ठाकरेंची साथ मिळण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि महायुतीला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली होती. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यभरात सभा घेत झंझावात निर्माण करतील, अशी आशा होती. परंतु, अद्यापपर्यंत राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एकदाही महायुतीच्या (Mahayuti) व्यासपीठावर दिसलेले नाहीत. परंतु, लवकरच राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांची पहिली सभा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ शकते.
राज ठाकरे हे भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरु शकतात, असे सांगितले जात आहे. 4 मे रोजी सिंधुदुर्गात राज ठाकरे यांची सभा होऊ शकते, अशी माहिती मनसे कार्यकर्त्यांकडून मिळत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गात मनसेचे कार्यकर्ते अगोदरच नारायण राणे यांच्या प्रचारासाठी कामाला लागले आहेत. रत्नागिरीमध्ये नुकतीच मनसेच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी सभा घेतली होती. त्यानंतर येत्या एक-दोन दिवसांमध्ये स्वत: राज ठाकरे सिंधुदुर्गात सभा घेऊन येथील प्रचारात रंग भरु शकतात. राज ठाकरे यांनी कोकणात सभा घेतल्यास ते याठिकाणी काय बोलणार, कोणावर टीका करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रविवारी रत्नागिरी-सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी अविनाश जाधव यांच्यासह मनसेचे प्रमुख नेते उपस्थित होते. या सभेत उदय सामंत आणि नारायण राणे यांनी सभेसाठी राज ठाकरे अनुपस्थित असल्याची खंत बोलून दाखवली होती. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे नाहीयेत, त्यामुळे त्यांची आठवण येते. राज ठाकरे यांचे आभार, मनसेने माझ्यासाठी भव्य सभा आयोजित केली, असे नारायण राणे यांनी म्हटले होते. तर उदय सामंत यांनी राज ठाकरेंचं भाषण व्यासपीठावरुन ऐकण्याचा योग यावा, अशी इच्छा बोलून दाखवली होती.
राज ठाकरेंनी राणेंसाठी सभा घेतल्यास ठाकरे गट आक्रमक होण्याची शक्यता
नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यापासून त्यांच्यात आणि शिवसैनिकांमध्ये विळ्याभोपळ्याचे नाते आहे. अलीकडच्या काळात नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसतात. ठाकरे गटाकडून राणेंना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जाते. त्यामुळे आता राज ठाकरे हे नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्यास ठाकरे गटात आणि जुन्या शिवसैनिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा