Suresh Dhas: परळीत करुणा शर्मांच्या कारमध्ये पिस्तुल ठेवणारा बुरखाधारी कोण?; सुरेश धसांनी नावासह सांगितलं
Suresh Dhas: मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी असलेल्या करुणा शर्मा यांनी 2021 मध्ये परळी दौरा केला होता. त्यावेळी, त्यांच्या कारमध्ये पिस्तुल आढळून आली होती.
संभाजीनगर : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्ह व आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची मागणी करत अनेक जिल्ह्यात मोर्चे काढण्यात येत आहे. बीड, परभणी, पुणेनंतर आज संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आमदार सुरेश धस (Suresh dhas) यांनी पुन्हा एकदा आका आणि आकाच्या आकाला लक्ष्य करत देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी केली. तसेच, वाल्मिक कराड हे 302 मधील आरोपी असून पुण्यातही मोठी संपत्ती त्यांनी जमवल्याचेही धस यांनी सांगितले. आपल्या भाषणातून करुणा शर्मा (Karuna sharma) यांचा उल्लेख करत त्यांच्या कारमध्ये बंदुक ठेवणारी व्यक्ती कोण होती, याचाही गौप्यस्फोट धस यांनी जाहीर भाषणातून केला आहे. दरम्यान, कोविड लॉकडाऊन काळात परळी दौऱ्यावर आलेल्या करुणा शर्मा यांच्या गाडीत आढळलेल्या पिस्तूलप्रकरणी कार चालकावर गुन्हा नोंदवून त्यास अटक करण्यात आली होती.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी असलेल्या करुणा शर्मा यांनी 2021 मध्ये परळी दौरा केला होता. त्यावेळी, त्यांच्या कारमध्ये पिस्तुल आढळून आली होती. मात्र, या कारमध्ये संशयास्पद वस्तू डिकीत ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पण, पिस्तूल कोणी ठेवले की अगोदपासूनच होते याचे गूढ कायम होते. आता, सुरेश धस यांनी नाव घेत संबंधित व्यक्ती पोलीस खात्यातीतलच होता, अशी माहिती दिली आहे. डॉ.देशमुख यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले, करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तुल टाकणारी बुरखा घालून आलेली व्यक्ती महिला नसून पोलीस होती, त्या पोलिसाचे नाव संजय सानप आहे, असा गौप्यस्फोटच सुरेश धस यांनी पैठणमधील जाहीर सभेतून केला आहे. तसेच, करुणा शर्मा या तुमच्या पहिल्या पत्नी आहेत, अशी आठवणही धनजंय मुंडेंना करुन दिली. धस यांच्या या दाव्यामुळे बीडच्या राजकारणात एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, परळी शहरात पोलीस आका आणि आकाच्या सांगण्यावरून सर्व काही गोळा करण्याचे काम केले जाते, हप्ता गेला पाहिजे, त्यांच्या हप्ताल्या कंटाळून एक सिमेंट कंपनी परळी सोडून गेली. एक आका आत आहे, दुसऱ्या आकाने याचे उत्तर द्यावे, असे म्हणत आमदार धस यांनी थेट धनंजय मुंडेंना सवाल केला आहे. बीडमधील हत्याप्रकरणाचा तपास सुरू आहे, पण या तपासासाठी सोनी टीव्हीमधील सीआयडीची नियुक्ती आता करावी. ओरिजिनल पोलिसांची नियुक्ती करू नये, अशी मागणी करणारे पत्र आपण मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचेही धस यांनी म्हटले.
छोटे आका यांना 2022 ला ईडीची नोटीस आली होती, यांच्या वाचमनच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन आहे. सुशील पाटील बिल्डरसह पुण्यात एफसी रोडवर वैशाली हॉटेलच्या बाजूला सात शॉप आका काढत आहे. येथील एका शॉपची किंमत 5 कोटी आहे. आरोपी विष्णू चाटेची बहीण, आकाची दुसरी पत्नी आणि वाल्मिक आकाच्या नावावर हे शॉप आहेत. 40 कोटींचे हे शॉप आहेत, अशी माहितीही सुरेश धस यांनी दिली. तर, बिल्डरची भेट घेऊन आलो, विचारलं आमच्या आकाला काय काय दिले. तर, आकाने 35 कोटींचे टेरिस मागितले होते. मगर पट्टा येथे एका फ्लॅटची किंमत 15 कोटी आहे आणि हा फ्लॅट कराडच्या ड्राव्हरच्या नावावर आहे, ज्याची किंमत 75 कोटी आहे. ड्राव्हरकडून आकाने राहण्यासाठी करार देखील करून ठेवले आहेत, असे अनेक धक्कादायक खुलासेच सुरेश धस यांनी पैठणमधील भाषणातून केले.
काही मोर्चे म्हणजे प्रीपेड रिचार्ज
ट्रॅक्टर चोरी, चंदन चोरी आणि कुणालाही मारा, आका तुमच्यासोबत आहे. परळीत 109 मृतदेह सापडले आहेत, काहींचे फक्त हडके सापडले आहेत. आका शंभर टक्के 302 चा आरोपी आहे, आकाचा आका सुद्धा लाईनमध्ये उभा आहे. जरीन खान पट्टेवालाला परळी स्टेशनमध्ये मार मार मारले आणि तो मेला. त्याच्या घरच्याला 40 लाख देऊन विषय मिटवला. जरीन खानची पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर हत्या झाली. आकाचा आका एकदा जेलमध्ये जाऊ द्या, मग पहा लोक कसे पुढे येतात, असेही धस यांनी म्हटले. कुणीही उठतो आणि या समाजाचा मोर्चा म्हणतात, समाजाचा मोर्चा नाही. मुद्दा भरकटण्यासाठी कलाकार आणले जातात, प्रीपेड रिचार्ज नेते आणले जातात, असे म्हणत धस यांनी लक्ष्मण हाकेंच्या मोर्चाला प्रीपेड रिचार्ज म्हटलं आहे.