महाविकास आघाडीशी MIM ची सकारात्मक चर्चा, इम्तियाज जलील यांची माहिती, एकटा लढलो तर पुन्हा बी टीम म्हणू नका, मविआ नेत्यांना इशारा
Maharashtra News: पुन्हा एकटा लढल्यानंतर पुन्हा बी टीम म्हणून बोट दाखवू नका, असा इशाराही जलील यांनी मविआच्या नेत्यांना दिला आहे.
Maharashtra News : छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीला एकत्र लढण्यासंदर्भात प्रस्ताव दिला असून मविआ सकारात्मक असल्याचा दावा इम्तियाज जलील यांनी केला आहे. मतांचं विभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडी बरोबर जायला तयार असून या बाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी एबीपी माझासोबत बोलताना सांगितलं आहे. दरम्यान, पुन्हा एकटा लढल्यानंतर पुन्हा बी टीम म्हणून बोट दाखवू नका, असा इशाराही जलील यांनी मविआच्या नेत्यांना दिला आहे.
इम्तियाज जलील यांनी बोलताना सांगितलं की, "महाविकास आघाडीला आम्ही एक प्रस्ताव दिला आहे. आपल्याला राज्यात भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे, अजित पवार नको असतील, तर मतांचं विभाजन टाळण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे. आज मी निवडणूक तुमच्यासोबत लढायला तयार आहे. तुम्ही जर मला तुमच्यासोबत नाही घेतलं आणि उद्या निवडणूक एकट्यानं लढलो, तर माझ्याकडे बोट दाखवू नका. तुमच्यामुळे आम्ही पडलो, तुम्ही याची बी टीम आहे, सी टीम आहे. मी स्पष्टपणे सांगतो, मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. तुम्ही नसाल घेत तर, मी एकटा चलो रेच्या भूमिकेत असेल. पण समोरून मला सकारात्मक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. चर्चा होण्याची शक्यता वाटत आहे."
महाराष्ट्रात राजकीय पेच; यंदा विधानसभा निवडणुकांमध्ये कमालीची चुरस
महाराष्ट्रातील राजकीय जल्लोषाचं खरं कारण आगामी विधानसभा निवडणुका हे आहे. दिवाळीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ शकतात, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. महाराष्ट्रात गेल्या महिन्यात विधान परिषदेच्या (एमएलसी) निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकांमध्ये एनडीएला दणदणीत विजय मिळाला होता. महायुतीनं 11 पैकी 9 जागा जिंकल्या होत्या. INDIA आघाडीमधून तीन उमेदवार होते, त्यापैकी फक्त 2 जिंकू शकले. काँग्रेसच्या 7 ते 8 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची बातमीही त्यावेळी समोर आली होती.
पाहा व्हिडीओ : Imtiyaz Jaleel MVA : मविआसोबत जाण्यासाठी तयार; सकारात्मक चर्चा सुरू जलील यांची माहिती