(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Milind Deora Resigns: मी विकासाच्या मार्गावर जातोय; काँग्रेसला राजीनामा दिल्यानंतर मिलिंद देवरांची पहिली प्रतिक्रिया
दक्षिण मुंबईवर ठाकरेंकडून सातत्यानं केल्या जाणाऱ्या दाव्यांमुळे मिलिंद देवरा नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसेच, मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचा हात सोडून आता शिंदेंचा हात पकडणार आहेत.
Milind Deora on Resignation from Congress: मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra Politics) काँग्रेसचे प्रबळ आणि ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण मुंबईवर ठाकरेंकडून सातत्यानं केल्या जाणाऱ्या दाव्यांमुळे मिलिंद देवरा नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसेच, मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचा हात सोडून आता शिंदेंचा हात पकडणार आहेत. अशातच मिलिंद देवरा यांनी ट्वीट करत काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. राजीनामा दिल्यानंतर मिलिंद देवरा यांनी एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी विकासाच्या मार्गावर जातोय, असं मिलिंद देवरा म्हणाले.
पक्षासोबतचं 55 वर्षांचं नातं संपवतोय; मिलिंद देवरा यांचं ट्वीट
मिलिंद देवरा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, "आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा शेवट होत आहे. मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देतोय. माझ्या कुटुंबाचं पक्षाशी असलेलं 55 वर्षांचं नातं संपुष्टात आलं आहे. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा वर्षानुवर्ष अखंड पाठिंबा दिल्याबद्दल आभारी आहे." मिलिंद देवरा यांच्या ट्वीटवर काँग्रेसनंही प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे खासदार आणि सरचिटणीस जयराम रमेश यांनी मिलिंद देवरांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
मिलिंद देवरा कोण?
काँग्रेस नेते मिलिंद देवरा हे मुंबई काँग्रेसमधील एक मोठं नाव. काँग्रेसमधील प्रबळ नेते आणि दक्षिण मुंबईतील काँग्रेसचा सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा अशी त्यांची ओळख. ठाकरेंकडून दक्षिण मुंबई मतदारसंघावर वारंवार दावा सांगण्यात आला आणि दुसरीकडे मिलिंद देवरांच्या नाराजीच्या बातम्या समोर येऊ लागल्या. आता याच नाराजीतून मिलिंद देवरा मोठं पाऊल उचलण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. मिलिंद देवरांच्या पक्ष बदलामुळे निश्चित काँग्रेसचं मोठ नुकसान होईल. पण दक्षिण मुंबईतील सगळीच राजकीय गणित मोठ्या प्रमाणात बदलू शकतात.
15 व्या लोकसभेतील सर्वात तरुण सदस्य म्हणून मिलिंद देवरांना ओळखलं जायचं. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी मिलिंद देवरा खासदार झाले. 2004 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या जयवंतीबेन मेहता विरुद्ध 10 हजार मतांच्या फरकानं विजय मिळवला. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत देवरा पुन्हा मुंबई दक्षिण मतदारसंघातून निवडून आले. मिलिंद देवरा यांचा जन्म 4 डिसेंबर 1976 रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील ज्येष्ठ राजकारणी आणि काँग्रेसचे प्रबळ नेते मुरली देवरा.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनाला फायदा होणार?
मिलिंद देवरा यांना सोबत घेतल्यानं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला नक्कीच फायदा होईल. सध्या शिंदेकडे दिल्लीत विशेष असा चेहरा नाही. मिलिंद देवरांच्या निमित्ताने दिल्लीच्या वर्तुळात आणखी जम बसवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना फायदा होणार आहे. याचसाठी मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्र श्रीकांत शिंदे देवरा यांना सोबत घेण्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे.
मिलिंद देवरा यांना गळाला लावून जरी एकनाथ शिंदे आपल्या पदरात दक्षिण मुंबईची जागा पाडून घेऊ इच्छित असले तरी याला भाजपचा विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या ठिकाणाहून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लोकसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. दुसरीकडे मंगलप्रभात लोढा देखील लोकसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यामुळे आगामी काळात शिवसेना भाजप वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत.
पाहा व्हिडीओ : Milind Deora at Siddhivinayk Temple : मिलिंद देवरा पक्षप्रवेशाआधी द्धिविनायक चरणी : ABP Majha
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मोठी बातमी! मिलिंद देवरा यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, आजच शिंदे गटात प्रवेशाची शक्यता