Maharashtra Politics : युतीचा निर्णय झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात आज पहिली बैठक
Maharashtra Politics : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात आज सकाळी बैठक पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Maharashtra Politics : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात आज दुपारी बैठक पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आगामी काळात वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. अशावेळी आज संध्याकाळी पार पडणाऱ्या महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) बैठकीला ठाकरे गटातील नेते उपस्थित राहणार का हा देखील एक सवाल आहे. कारण वंचित बहुजन आघाडी सोबत ठाकरे गट गेल्यास महाविकास आघाडीचे काय असा देखील सवाल उपस्थित होत आहे.
आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याची घोषणा वंचितकडून करण्यात आली. त्यानंतर आज वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट यांची आज पहिली बैठक होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात आज दुपारी मुंबईत चर्चा होणार आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरेंसोबत युती करण्याआधी महाविकास आघाडीमधील वंचितच्या स्थानाबाबत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं होतं. त्याबाबत ठाकरे गट आता काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल. दुसरीकडे आंबेडकर आणि ठाकरे यांचं ठरत असताना शिंदे गटही प्रकाश आंबेडकर यांना आपल्याकडे आणण्याचे प्रयत्न करत असल्याचं कळतं.
महाविकास आघाडीचं पुढे काय होणार?
काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे एकत्र येणार असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना विचारला असता त्यांनी देखील याबाबत सकारात्मकता दर्शवली होती. मात्र वंचित बहुजन आघाडीकडून राष्ट्रवादी संदर्भातल्या चर्चेला ना पसंती दर्शवण्यात आली होती. त्यामुळे आता आज जर उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीची बैठक पार पडली तर महाविकास आघाडीचं पुढे काय होणार असा देखील एक सवाल आहे.
वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या युतीमुळे राजकीय समीकरणे बदलणार?
दरम्यान शिवसेनेसोबत युती करण्यासाठी काहीही हरकत नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितल्यानंतर शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकत्र येतील अशा चर्चा सुरु झाली होती. काही दिवसांपूर्वी मुंबईत प्रबोधनकार ठाकरे यांच्या साहित्याला अर्पण करण्यात आलेली, प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटासोबतच्या युतीबाबत सकारात्मक संकेत दिले होते. काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीने शिवसेना ठाकरे गटासोबत युती करण्याची घोषणा केली. शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.
महाविकास आघाडीची आज बैठक
दरम्यान, आगामी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी पाच वाजता महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. अधिवेशन काळात मांडायच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे. तसंच 19 तारखेला राष्ट्रवादीच्या शेतकरी मोर्चाबाबत देखील बैठकीत चर्चा होणार आहे.
संबंधित बातमी
पुन्हा एकदा शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग! शिवसेना ठाकरे गटासोबतच्या युतीसाठी वंचित तयार, पण...