Manoj Jarange Patil: तुमच्या नेत्यांनाही महाराष्ट्रात फिरायचंय, गुंडगिरी किती दिवस सहन करायची; मनोज जरांगेंचा मुंडे बहीण-भावाला इशारा
Beed News: येत्या चार जून रोजी जरांगे नारायण गडावर सभा घेणार आहेत. त्यानंतर चार जून रोजी ते उपोषणाला बसणार आहेत, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापणार.
बीड: तुमच्याही नेत्यांना महाराष्ट्रात फिरायचं आहे. तुमची गुंडगिरी आम्ही किती दिवस सहन करायची, असा सवाल विचारत मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे बहीण-भावावर हल्लाबोल केला. बीडच्या नांदुर घाट गावात रात्री झालेल्या दगडफेकीमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. या जखमी रुग्णांची मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी गुरुवारी बीड जिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र डागले. मला सुद्धा धमकी देत आहेत, बघून घेऊ ,कचाट्यात ये मारून टाकू, मला बीडमध्ये (Beed News) येऊ द्यायचं नाही, असे म्हणत आहेत. आता तर मी रोज बीडमध्ये येणार, दोघं बहीण-भाऊ कार्यकर्त्यांना माझ्या विरोधात पोस्ट टाकायला लावत आहेत, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणाला नाव ठेवलं त्यावेळेस विरोध केला. पण मी एकदाही म्हणालो नाही पंकजा ताईला पाडा किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार पाडा. पण हे आम्हाला माहिती आहे वेळ निघून गेले की असं होणारच. मी बलिदान देण्यासाठी तयार आहे. मात्र, मी मागे हटणार नाही. मला बीडमध्ये येऊ देणार नाहीत तर तुमच्याही नेत्यांना महाराष्ट्रात फिरायचं आहे. तुमची गुंडगिरी आम्ही किती दिवस सहन करायची आमच्याकडेही खुंखार लोक आहेत. मराठा समाज इतका लेचापेचा नाही, तुमच्याही नेत्यांना महाराष्ट्रात आणि मुंबई, पुणे, संभाजीनगरला फिरायचं आहे. मला बीडमध्ये येऊ देणार नाहीत, असं म्हणत आहेत. मराठा समाजाचे असे उपकार फेडता का? तुमच्या व्यासपीठावर मराठा समाजातील नेत्यांना बसायला जागा नव्हती.
मराठा समाजात खूप मोठी खदखद निर्माण झालेय: मनोज जरांगे
मराठ्यांची मतं लागतात, मराठ्याचे नेते प्रचाराला लागतात. मराठ्याच्या मतांवर मोठे व्हावे लागते, पण अन्याय हा प्रत्येकवर्षी सुरु आहे. स्वतःचे संकट अंगावर आहे त्यावेळेस आपला सहित पाया पडतात आणि संकट निघून गेलं की लगेच बदलतात. आष्टी पाटोद्यात काय झालं, बीडमध्ये काय झालं, माजलगाव आणि परळीमध्ये काय झालं संपूर्ण महाराष्ट्र बघतोय.
मराठ्यांच्या जीवावर मोठा घेऊन मराठ्यांचा जीव घ्यायचा असेल तर मराठा जीव द्यायला तयार आहे. दोघा बहीण-भावांचा विषय आहे. शेवटी मराठी मत घ्यायचे मोठे व्हायचं, कोणत्याही पक्षात राहायचं आणि मोठं व्हायचं. हा खरा अपमान मराठा नेत्यांचा आहे. जात संपली तर नेत्यांना काय किंमत राहणार?, असा सवाल जरांगे -पाटील यांनी उपस्थित केला.
माझं रक्षण मराठा समाज करत आहे. मला कोणाची गरज नाही. बघू किती दिवस सहन होत आहे. ते पोलीस अधीक्षक कशामुळे गुन्हे दाखल करून घेत नाहीत? लेकरांची तडफड होते, गृहमंत्री साहेबांचे राज्य आहे का? अन्याय सुरू आहे. जात संपली की तुम्हीही संपलात, मराठ्यांच्या नेत्यांनो सावधान, आम्ही शांत पद्धतीने बघणार आहोत. बहिण भाऊ किती दिवस हल्ले करून येतात हे पाहणार आहोत. जोपर्यंत सहन होत आहे, तोपर्यंत सहन करू, पण मराठा समाजात खूप मोठी खदखद निर्माण झाली आहे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.
आणखी वाचा