आनंद अडसुळांना नवनीत राणांचाच प्रचार करावा लागण्याची चिन्हं, महायुती अमरावती लोकसभा युवा स्वाभिमानी पार्टीला सोडणार?
Amravati Loksabha Seat: एकवेळ राजकारण सोडेन पण नवनीत राणांच्या प्रचाराला जाणार नाही,अशी भूमिका शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी घेतली होती. यानंतरही महायुतीकडून या जागेवरुन नवनीत राणा यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
अमरावती: गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असणारी अमरावती लोकसभेची जागा घटक पक्ष म्हणून युवा स्वाभिमान पार्टीला सोडण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) ह्या पुन्हा युवा स्वाभिमान पार्टी कडूनच 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. काही दिवसांपासून नवनीत राणा या भाजपमध्ये (BJP) प्रवेश करून कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. परंतु अमरावतीची जागा ही घटक पक्ष असलेल्या राणा दाम्पत्य यांच्या युवा स्वाभिमान पार्टीला (Yuva Swabhimani Party) सोडण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. लवकरच महायुतीकडून तशी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्रात आहेत. ते महायुतीच्या नेत्यांशी लोकसभेच्या जागावाटपाबाबत (Loksabha Seat Sharing) चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होईल.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. महाराष्ट्रात भाजप किती जागेवर लढणार आणि मित्र पक्षांना किती जागा देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार आणि इतरांना किती जागा मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप 22 किंवा 23 जागेवर आपले उमेदवार उभे करणार असून इतर 25 ते 26 जागा मित्र पक्षांना देणार असल्याची माहिती आहे. यापैकी सर्वाधिक चर्चेत असलेली अमरावती लोकसभेची जागा ही युवा स्वाभिमान पार्टीला सोडणार असल्याची सुद्धा माहिती आहे. जर नवनीत राणा यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवली तर भाजपच्या कोट्यातील एक जागा कमी होईल. कारण राणा दापत्य हे भाजपसोबतच आहे. त्यामुळे ही जागा घटक पक्षाला सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नवनीत राणांच्या जातप्रमाणपत्राचा मुद्दा
अमरावतीची जागा ही शिवसेनेची आहे. नवनीत राणा या भाजपमध्ये जरी गेल्या तरी त्यांना ही जागा मिळणार का? आम्ही आमचा क्लेम सोडणार नाही. आम्ही कुठल्याही परिस्थितीत लढणार अशी प्रतिक्रिया नुकतीच शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिली होती. त्यामुळे राणा दाम्पत्य आणि अडसूळ हे दोघेही घटक पक्षात असल्याने ही जागा कोणाला सुटणार अशी चर्चा जोरदार सुरू असताना आता ही जागा युवा स्वाभिमान पार्टीला सोडण्यात येणार असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वीच नवनीत राणा यांचा जात प्रमाणपत्राचा निकाल लागणार आहे. मुंबई हायकोर्टाने 108 पानाचा जजमेंट दिला आहे. त्यामध्ये राणा यांचे सात ही जात प्रमाणपत्र खोटे ठरविले आहे. आता ही केस सुप्रीम कोर्टात आहे त्याचा निकाल काही दिवसांत लागणार आहे. आता तो निकाल काय राहील याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा
एकवेळ राजकारण सोडेन पण नवनीत राणांच्या प्रचाराला जाणार नाही; आनंदराव अडसूळ कडाडले