विधानसभेची खडाजंगी: बाळासाहेबांचा बालेकिल्ला कोणाच्या ताब्यात जाणार? छत्रपती संभाजीनगराचे 9 मतदारसंघ, आमदारांची यादी
Maharashtra politics: बाळासाहेबांचा बालेकिल्ला कोणाच्या ताब्यात जाणार? छत्रपती संभाजीनगराचे 9 मतदारसंघ, आमदारांची यादी
Chhatrapati Sambhajinagar: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी संपली असून आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) वारे सध्या वाहू लागले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या विधानसभेच्या निवडणूकीत (Vidhansabha Election 2024) शिवसेना विरुद्ध शिवसेना (Shivsena vs Shivsena) अशीच लढत राहणार असून लोकसभेच्या निवडणूकीनंतर उद्धव ठाकरे पुन्हा त्वेषाने लढा उभारतात की एकनाथ शिंदे त्यांच्यावर मात करतात? हा औत्सूक्याचा विषय असणार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या बाजूने मिळालेला कौल फुटीनंतर बदलला. आता ठाकरे विरुद्ध शिंदे या लढ्यात शिवसेना नक्की कोणाची? या प्रश्नाचे उत्तर विधानसभा निवडणूकीनंतर स्पष्ट होऊ शकेल.
9 पैकी 6 जागा गेल्या शिंदेंच्या शिवसेनेकडे
मराठवाड्याची राजधानी असणारे आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचे समजल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९ मतदारसंघ. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत ९ पैकी ६ मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व दिसून आले. तीन मतदारसंघातून भाजपची आघाडी होती. यानंतर झालेल्या शिवसेना पक्षफूटीमध्ये जिल्ह्यातील पैठण, सिल्लोड, वैजापूर, औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्य अशा पाच मतदारसंघातील आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले. केवळ कन्नड मतदारसंघातील आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत राहिल्याने उद्धव ठाकरेंना २०१९ च्या विधानसभेत छत्रपती संभाजीनगरमधून केवळ एकाच आमदारावर समाधान मानावे लागले. लोकसभा निवडणूकीपूर्वी कन्नड विधानसभा मतदारसंघही आपल्याकडे आला पाहिजे असे आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी केले होते. लोकसभा निवडणूकीत कन्नड-सोयगाव मतदारसंघातून संदिपान भूमरेंना मताधिक्य मिळाल्याने शिंदेच्या शिवसेनेचा आत्मविश्वास अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आता कन्नड मतदारसंघ तरी राखता येईल का? याची उत्सूकता दिसून येत आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला कुणाकडे राहणार?
छत्रपती संभाजीनगरमध्ये १९८९ ते २०१९ या तीन दशकांमध्ये १९९८ च्या एका निवडणूकीचा अपवाद वगळता प्रत्येक वेळी शिवसेना-भाजप युतीचा खासदार निवडून आल्याने छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मोरेश्वर सावे, प्रदीप जैसवाल आणि चंद्रकांत खैरे या शिवसेनेच्या खासदारांनी जिल्ह्याचं प्रतिनिधीत्व केलं. २०१९ च्या निवडणूकीत मात्र, इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेंवर मात केली. २०२४ च्या लोकसभेत शिंदेंच्या सेनेतील संदिपान भूमरे निवडून आले. औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि शिवसेनेची फूट या दोन्ही घटनांनंतर यंदाच्या लोकसभेच्या निवडणूकीतही झाल्याचे दिसले.
छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात कोण कोण आमदार आहेत?
सिल्लोड विधानसभा - अब्दुल सत्तार (शिवसेना - एकनाथ शिंदे)
कन्नड विधानसभा - उदयसिंग राजपूत (शिवसेना- उद्धव ठाकरे)
फुलंब्री विधानसभा - हरिभाऊ बागडे (भाजप)
औरंगाबाद मध्य विधानसभा - प्रदीप जयस्वाल (शिवसेना - एकनाथ शिंदे)
औरंगाबाद पश्चिम विधानसभा - संजय शिरसाट (शिवसेना - एकनाथ शिंदे)
औरंगाबाद पूर्व विधानसभा - अतुल सावे (भाजप)
पैठण विधानसभा - संदीपान भुमरे (शिवसेना - एकनाथ शिंदे) - सध्या खासदार
गंगापूर विधानसभा - प्रशांत बंब (भाजप)
वैजापूर विधानसभा - रमेश बोरनारे (शिवसेना - एकनाथ शिंदे)
विधानसभेत छत्रपती संभाजीनगरची लढत कशी राहणार? कोणाचं पक्षीय बलाबल कसे?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अवघ्या तीन ते चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. राज्यात याआधी २०१९ मध्ये विधानसभा निवडणूका झाल्या होत्या. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणूका होण्याची शक्यता असताना राज्यभरातील पक्षांनी विधानसभेसाठी आता मोर्चेबांधणी सुरु केलीये. मराठवाड्यात मराठा ओबीसी आरक्षण हा विधानसभा निवडणूकांचा केंद्रबिंदू एकीकडे होत असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणूकीनंतर आता आढावा बैठका, मराठवाड्यात नेत्यांच्या चकरा वाढल्या आहेत. दरम्यान, विधानसभेसाठी महत्वाचा समजला जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरसाठी किती मतदारसंघातून निवडणूक लढवली जाणार? कोणत्या पक्षाचं कसं बलाबल आहे?
राज्याच्या एकूण २८८ जागांसाठी लढवल्या जाणाऱ्या विधानसभा निवडणूकीत मराठवाड्यात एकूण ४८ मतदारसंघ आहेत. यापैकी छत्रपती संभाजीनगरसाठी एकूण ९ विधानसभा मतदारसंघांसाठी लढत होणार आहे. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणूकीमध्ये एकूण ९ पैकी सहा जागांवर वर्चस्व असणाऱ्या शिवसेनेला पक्षफूटीनंतर मोठा फटका बसला. शिवसेनाफुटीला दोन वर्ष होऊन गेल्यानंतर लोकसभेतही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला यश न आल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक महत्वाची ठरणार आहे.
हेही वाचा:
Maharashtra MLA List : महाराष्ट्रातील सर्व आमदारांची नावे, 288 विधानसभा, जिल्हानिहाय आमदारांची यादी