Samajwadi party quits MVA: मविआकडून सभात्याग करत वातावरणनिर्मिती, अबू आझमींकडून पहिल्याच दिवशी सेटबॅक, एकट्यानेच शपथ घेत दिला धक्का
Samajwadi party quits MVA: समाजवादी पक्षाच्या अबु आझमींचा मविआला धक्का. ठाकरे गटाच्या भूमिकेवरुन महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी. रईस शेख आणि अबु आझमींनी शपथ घेतली.
मुंबई: उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत हिंदुत्त्वाचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा आदेश शिवसैनिकांना दिल्यानंतर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (MLA Abu Azmi) प्रचंड नाराज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अबु आझमी यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या (Vidhan Sabha Adhiveshan) पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे स्पष्ट संकेत दिले. विधानसभा निवडणुकीत मविआने घटकपक्ष असलेल्या समाजवादी पक्षासाठी (Samajwadi Party) जागा सोडल्या होत्या. सपाचे अबु आझमी हे शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा आणि रईस शेख हे भिवंडी मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अबु आझमी यांनी महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) बाहेर पडण्याचे संकेत दिले. तर दुसरीकडे भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी कालच सोशल मीडियावरुन ठाकरे गटाच्या हिंदुत्त्ववादी भूमिकेचा विरोध केला होता. त्यामुळे आता समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदार मविआतून बाहेर पडतील, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
मविआच्या सर्व आमदारांनी आज शपथ घेण्यास नकार देत विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता. मात्र, अबु आझमी यांनी मविआच्या भूमिकेशी फारकत घेत आमदारकीची शपथ घेतली. तर भिवंडीचे आमदार रईस शेख यांनीही आमदारकीची शपथ घेतली.
अबु आझमी यांनी मविआतून बाहेर पडण्याचे कारण सांगताना म्हटले की, मविआचा घटकपक्ष असलेला एक पक्ष म्हणतो की, आम्ही हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर कायम आहोत. उद्धव ठाकरे यांच्याकडून हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर काम करा, असे कार्यकर्त्यांना सांगितले जाते. 6 डिसेंबरला बाबरी मशीद पाडणाऱ्यांचे अभिनंदन केले जाते. अशा पक्षासोबत समाजवादी पार्टी राहू शकत नाही. त्यामुळे मी मविआसोबत राहीन, असे वाटत नाही. समाजवादी पक्ष सेक्युलर आहे, आम्ही कम्युनल भाषा करणाऱ्या पक्षासोबत कसे राहणार?, असा सवाल अबु आझमी यांनी उपस्थित केला. तसेच मविआचा ईव्हीएम संदर्भातील मुद्दा पूर्णपणे मान्य नसल्याचेही त्यांनी म्हटले. पण निवडणूक आयोगाने ईव्हीएम संदर्भातील संशय दूर करावा, असे त्यांनी म्हटले.
अबु आझमींच्या निर्णयावर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया
अबु आझमी यांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अबु आझमी यांनी समाजवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारून त्यांनी हा निर्णय घेतला असेल तर त्यावर मी काय बोलू? वरिष्ठ नेते या सगळ्या संदर्भातला निर्णय घेतील. महापालिका निवडणुका समोर आहेत एकत्र मिळून लढणार आहोत. मात्र, समाजवादी पक्ष वेगळी भूमिका घेत असेल तर बघू, असे सुनील प्रभू यांनी म्हटले.
आणखी वाचा