Vidhan Sabha Election : जागावाटपावरून दोन्ही आघाड्यांची डोकेदुखी वाढणार? शिंदे-अजितदादांचं समाधान होणार?
Vidhan Sabha Election : महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटकपक्षांनी आतापासूनच अनेक जागांवर दावा सांगायला सुरूवात केली असून विधानसभेवेळी जागावाटपाचा तिढा पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि महायुतीतले (Mahayuti) जागावाटप शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होतं. महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेने सर्वाधिक जागांवर दावा सांगून काँग्रेसच्याही काही जागा पळवल्या. सांगली, दक्षिण मध्य मुंबई या जागांचा वाद शेवटपर्यंत सुरू होता. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेने भाजपाला चर्चेत शेवटपर्यंत गुंतवून ठाणे, नाशिक संभाजीनगर या जागा आपल्याकडे कायम राखल्या. त्यावरून 48 जागांच्या वाटपासाठी झालेली रस्सीखेच लक्षात घेता विधानसभेच्या 288 जागांचे वाटप म्हणजे किती डोकेदुखीच असणार आहे याचा साधारणता अंदाज येतो.
मुंबईत ठाकरेंचा जास्त जागांवर दावा
ठाकरेंच्या शिवसेनेने विधानसभेच्या सुमारे सव्वाशे जागा लढवण्यासाठी आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबईतल्या दोन तृतीयांश जागांवर आपला दावाही ठोकला आहे. लोकसभा निवडणुकीत कमी जागा लढवूनही राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला हे मान्य होईल असे वाटत नाही.
विदर्भात काँग्रेसचा दावा
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मुंबईत फारशे अस्तित्व नसले तरी काँग्रेस एवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबईतल्या जागा सोडेल याची शक्यता तशी कमीच आहे. अर्थात ठाकरेंनी जसा मुंबईतल्या जागांवर रुमाल टाकून आपला हक्क सांगितलाय तसाच काहीसा प्रकार विदर्भातल्या जागांबाबत काँग्रेसकडून आणि पश्चिम महाराष्ट्रातील जागांबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे जागावाटप तेवढे सोपे असणार नाही
तिकडे महायुतीतही जागा वाटपाची प्रक्रिया सहज सुलभ असेल असं वाटत नाही. भाजपाने साधारणता 150 ते 160 जागा लढवण्याचे तयारी सुरू केली आहे. तर शिंदेंनी शंभर जागांवर दावा ठोकला आहे. जेवढ्या जागा शिंदेंना मिळतील तेवढ्याच आपल्यालाही मिळाल्या पाहिजेत अशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका आहे.
महायुतीत जागांचा पेच कसा सुटणार?
या तिघांच्या अपेक्षांची बेरीज केली तर महाराष्ट्रातील विधानसभेचे मतदारसंघ आणखी शंभराने वाढवावे लागतील. याचाच अर्थ 288 जागांचे वाटप सोपं असणार नाही हाच आहे. 2019 च्या संख्याबळानुसार जागांचं वाटप करावं असं सूत्र मान्य झालं तरी, 2014 ला निवडून आलेल्या एकसंघ पक्षाच्या जागा गृहीत धरायच्या की आता शिंदे आणि अजित दादांबरोबर असणाऱ्या आमदार यांची संख्या गृहीत धरायची हा पेच येणारच आहे.
शिंदे-दादांचं समाधान होणार का?
जर सध्याचे संख्याबळ लक्षात घेतलं तर भाजपाचे स्वतःचे आणि सहयोगी पक्षाचे 114 आमदार आहेत. शिंदेंबरोबर आलेले 50 आणि दादांसोबत असलेले 40, असं 200 जागाच वाटप तर सहजपणे होऊ शकेल. पण उरलेल्या 85 जागा कशा वाटायच्या हा प्रश्न येईलच. त्या जागा संख्याबळानुसार वाटायच्या ठरल्या तर भाजपाला 40-42 आणि शिंदे आणि अजित पवारांना मिळून 40 अशा जागा दिल्या जातील. यामुळे भाजपाची बेरीज 150 पर्यंत जाईल. पण शिंदेंना मात्र 70 आणि अजितदादांना 60 जागा मिळू शकतील तेवढ्या जागांवर समाधान होईल का? हा प्रश्न आहे. सध्या तरी त्यांची तशी मनस्थिती असल्याचं दिसत नाही.
ही बातमी वाचा :