(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bawankule on Pankaja Munde : भाजपच्याच नेत्यांकडून पंकजा मुंडेंना बदनाम करण्याचा कट; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा गौप्यस्फोट
Chandrashekhar Bawankule: पंकजा मुंडेंची बदनामी कोण करतंय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Chandrashekhar Bawankule: गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आपल्या पक्षात नाराज असल्याच्या बातम्या सतत येत आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून पंकजा यांना डावलण्यात येत असल्याची देखील अनेकदा चर्चा झाली. मात्र याबाबत आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोठं गौप्यस्फोट केला असून, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपच्याच नेत्यांकडून (BJP Leader) पंकजा मुंडेंना बदनाम करण्याचा कट रचला जात असल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे स्वतः मराठवाड्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात प्रचारसभा घेत आहेत. दरम्यान त्यांनी जालना येथे देखील प्रचार सभा घेतली. याचवेळी 'एबीपी माझा'ला प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केले आहे. भाजपमधीलच एक युनिट पंकजा मुंडे आणि पक्षाची बदनामी करत आहेत. कोणीतरी हे जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करत आहे. तर बीडमधील स्टेजवरील व्हायरल व्हिडीओवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, "पंकजाताईंना सन्मानार्थ माझ्यानंतर बोलण्याचा मीच त्यांना आग्रह केला. पंकजा मुंडे या आमच्या राष्ट्रीय नेत्या असून, त्यावर अपमान समजणे हास्यास्पद आहे." तर पक्षातीलच काही लोक पंकजा मुंडेंना आणि पक्षाला बदनाम करत असल्याचा आरोपच बावनकुळे यांनी केला आहे.
पंकजा मुंडेंची बदनामी कोण करतंय?
पंकजा मुंडे यांना पक्षात डावलण्यात येत असल्याचा आरोप अनेकदा झाला. तर खुद्द पंकजा मुंडे यांनी देखील आपल्या मनातील खदखद जाहीरपणे कोणाचेही नाव न घेता मांडली होती. याच काळात त्यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपल्या पक्षात येण्याची ऑफर देखील देण्यात आली. त्यामुळे पंकजा मुंडे भाजप सोडतील असे चित्र निर्माण झाले होते. मात्र आता खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. खुद्द भाजपमधूनच पंकजा मुंडे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. तर पंकजा मुंडेंची बदनामी कोण करतंय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
पंकजा मुंडेंचा व्हिडीओ व्हायरल!
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बीड येथे झालेल्या प्रचारसभेत पंकजा मुंडे भाषण करण्यासाठी उठल्या असता त्यांना थांबवून बावनकुळे यांनी थांबवत स्वतः आधी भाषण केले. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्याला आधी भाषण करण्याची विनंती केली. पण आपण आधी करणार असे म्हणत बावनकुळे यांनी भाषण केले. या सर्व घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तर यावरच बोलताना बावनकुळे म्हणाले की, पंकजाताईंना सन्मानार्थ माझ्यानंतर बोलण्याचा मीच त्यांना आग्रह केला. पंकजा मुंडे या आमच्या राष्ट्रीय नेत्या असून, त्यावर अपमान समजणे हास्यास्पद आहे."
व्हिडिओ एडीट करणाऱ्याचा पोलीस शोध घेतील
दरम्यान बीडमधील प्रचारसभेच्या भाषणादरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पंकजा मुंडे यांच्यामधील संवादाचा विडिओ एडिट करून पोस्ट करण्यात आला असल्याचं बावनकुळे म्हणाले. त्यामुळे अशाप्रकारे व्हिडिओ एडीट करणाऱ्या व्यक्तीच्याविरोधात पोलीस कारवाई करणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे. तसेच भाजप नेते जाणीवपूर्वक पंकजांना चुकीची वागणूक देतात अशा आशयाचा व्हिडिओ करणाऱ्या व्यक्तीला पोलीस आणि आमचे कार्यकर्ते शोधून काढतील असे म्हणत, पक्षात पंकजा मुंडे यांच्या प्रत्येक निर्णयाला पाठबळ दिले जाते असेही बावनकुळे म्हणालेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Beed News: पंकजा मुंडेंना डावलून जयदत्त क्षीरसागर यांच्याशी फडणवीसांची सलगी