Maharashtra Monsoon Session 2025 : मोठी बातमी : वरुण सरदेसाईंच्या प्रश्नावरुन राडा, आदित्य ठाकरे भिडले, शंभूराज देसाई म्हणाले, तुमच्या नाकाला मिरच्या का लागल्या?
Maharashtra Monsoon Session 2025 : आमदार वरून सरदेसाई यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले.

Maharashtra Monsoon Session 2025 : मुंबई वांद्रे परिसरात 42 एकर जमीन डिफेन्स लँड संरक्षण विभागाच्या मालकीची असल्यामुळे 9483 झोपड्यांचे पुनर्वसन रखडले आहे. ही लक्षवेधी ठाकरे गटाचे आमदार वरूण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी विधानसभेत मांडली. यानंतर मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या उत्तरावर ठाकरे गटाचे आमदार चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. तर ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी देखील विधानसभेत आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले.
शंभूराज देसाई म्हणाले की, मला यात अधिक खोलात जायचे नव्हते पण आता माझ्याकडे अपूर्ण ब्रीफिंग आहे. मला नम्रपणे सांगायचे आहे की 2019 ते 2022 या वर्षांमध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारने केंद्राकडे केलेला नाही. मंत्री शंभूराजे देसाई यांनी असे म्हणताच विधानसभेत प्रचंड गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले.
तुमच्या नाकाला मिरच्या का लागल्या?
यानंतर शंभूराजे देसाई म्हणाले की, तुम्ही 2019 ते 2022 पर्यंत काय केले? याबाबत सांगा. एकदाही पत्र दिले नाही. एकदाही पाठपुरावा केला नाही. त्यावेळी कोणाचे सरकार होते? 2022 साली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर चार वेळा आम्ही पत्र दिली. तुम्ही काय केले? आमचे लाज काढू नका. तुम्ही काय केले ते सांगा? असे म्हणत शंभूराज देसाई यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. मी 2019 ते 2020 यावेळेत पाठपुरावा झाला नाही, हे मी म्हटलो.जर मी कोणाचं नाव घेतलं नाही तर मग एवढी नाकाला मिरची लागायचं कारण काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
रेल्वेची जागा घेतली आहे तर त्याला विरोध का?
यानंतर अतुल भातकळकर म्हणाले की, या प्रश्नांमुळे माझा ही मतदारसंघ बाधित आहे. त्या जागेवर झोपडपट्टी झाल्या आहेत. यावर मंत्री महोदय सकारात्मक उत्तर देत आहेत. धारावी पुनर्विकासासाठी जर रेल्वेची जागा घेतली आहे तर त्याला विरोध का? 2016 च्या परिपत्रकानुसार काम करण्याची भूमिका घेतली आहे. नवीन कामाला परवानगी देण्यासाठी राज्य सरकार काय प्रयत्न करणार? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी शंभुराजे देसाई यांनी या संदर्भात माझ्या दालनात बैठक घेतली जाईल, असे माहिती दिली.
विधानसभेचे कामकाज तहकूब
यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले की, मंत्री सभागृहाची दिशाभूल करत आहेत. चुकीची उत्तरं देत आहेत म्हणून हक्कभंग आणायचा का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर भास्कर जाधव म्हणाले की, कोणत्याही मंत्र्याला कोणत्याही खात्याबाबत बोलता येत नाही. सभागृहाच्या नियमानुसार तसे करायचे असेल तर विधानसभा अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. शंभुराज देसाई नगरविकास खात्याच्या प्रश्नांवर कसे बोलू शकतात. ते मुख्यमंत्री आहेत का? त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले होते का? असा सवाल भास्कर जाधव यांनी विचारला. यानंतर सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. भास्कर जाधव आणि सत्ताधारी आमदारांची हमरीतुमरी झाली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
आणखी वाचा
























