Dhairyasheel Mane on Karnataka : कर्नाटकच्या गळचेपीविरोधात पडसाद उमटल्यास महाराष्ट्र जबाबदार नाही, खासदार धैर्यशील माने यांचा थेट इशारा!
Kolhapur News : शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना बेळगावात प्रवेशबंदी करण्यात आली. बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश पोलिसांना दिले आहे. त्या दृष्टीने बेळगावमध्ये पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
Kolhapur News : महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra Karnataka Border Dispute) यांच्यातील वाद आता कुठे शांत होत असल्याचं दिसत असतानाच पुन्हा या वादाला हवा मिळाली आहे. शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांना बेळगावात (Belgaon) प्रवेशबंदी करण्यात आली. बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश पोलिसांना दिले आहे. त्या दृष्टीने बेळगावमध्ये पोलिसांनी (Belgoan Police) बंदोबस्त वाढवला आहे. बेळगावमधील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी खासदार धैर्यशील माने जाणार होते.
'केवळ मराठी माणसाचा आवाज दाबण्यासाठी कर्नाटकची दडपशाही'
केवळ मराठी माणसाचा आवाज दाबण्यासाठी कर्नाटक सरकारने हे कृत्य केल्याचं आरोप खासदार धैर्यशील माने यांनी केला आहे. एबीपी माझाशी बोलताना धैर्यशील माने म्हणाले की, "संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांना वीरमरण आलं त्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी हुतात्मा चौकात आदरांजली वाहण्याची प्रथा आहे. या निमित्ताने आज महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व सीमाबांधवांनी या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. मी ते स्वीकारलं. कालपर्यंत त्यांच्याशी चर्चा करुन तुमच्या वतीने कोण कोण येणार आहेत अशी विचारणा करत त्यांना रीतसर परवानगी दिली जाईळ, असंही कर्नाटक प्रशासनाने सांगितलं. रीतसर परवानगी मागितल्यानंतर कर्नाटकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रात्रीच प्रवेशबंदीचे आदेश काढल्याचं मला समजलं. मागच्यावेळी असेच आदेश निघाले होते. कर्नाटक सरकार वारंवार हुकूमशाहीचं तसंच सीमावासियांमध्ये दडपशाहीचं काम करत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला आदेश संविधानाला सोडून आहे."
पडसाद उमटले तर कर्नाटकने महाराष्ट्राला जबाबदार धरु नये : धैर्यशील माने
"आज भाषण किंवा इतर काही कार्यक्रम नव्हता केवळ अभिवादन करायचं होतं. आम्हाला अडवतात मात्र त्यांचे मंत्री मात्र महाराष्ट्रात बिनधास्त येतात. सुसंवाद बिघडू नये याची काळजी महाराष्ट्र घेते, मात्र कर्नाटक तसे करत नाही. समन्वय ठेवायचा नसेल तर समिती कशासाठी? दोन्ही राज्यांकडून ही समिती असते. तर त्यामध्ये चांगली चर्चा असेल. तर एखादा लोकप्रतिनिधी पलीकडच्या राज्यात जातोय तर अतिरेकी आल्यासारखे तुम्ही फौजफाटा लावला, नेमकं तुमचं कारण काय, हा दडपशाहीचा भाग आहे." "कर्नाटकचे हे सगळं कृत्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून देणार आहे. कायदा सांभाळणं हे एका राज्याचं काम नाही. गळचेपीच्या विरोधात पडसाद उमटले तर त्याला कर्नाटकने महाराष्ट्राला जबाबदार धरु नये," असा इशाराही धैर्यशील माने यांनी दिला.
VIDEO : Dhairyasheel Mane on Karnataka : धैर्यशील माने यांचा कर्नाटक सरकारला थेट इशारा, म्हणाले...