Maharashtra Assembly Session : मंत्रिपद मिळावं म्हणून इम्प्रेस करण्यासाठी माझ्याविरोधात घोषणा : आदित्य ठाकरे
Maharashtra Assembly Session Aaditya Thackeray : शिंदे गटाच्या आमदारांनी थेट शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनाच लक्ष्य केलं. यावर "मंत्रिपद मिळावं म्हणून इम्प्रेस करण्यासाठी माझ्याविरोधात घोषणा दिल्या जात आहेत," अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली
Maharashtra Assembly Session Aaditya Thackeray : "मंत्रिपद मिळावं म्हणून इम्प्रेस करण्यासाठी माझ्याविरोधात घोषणा दिल्या जात आहेत," अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे गटाने (Shinde Group) केलेल्या बॅनरबाजीवर दिली. "मला पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्यांची कीव येते. त्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसत आहे. शिवसेनेला वाढता पाठिंबा मिळत असल्यामुळे त्यांची अशी परिस्थिती आहे. त्यांच्यावर झालेले संस्कार आज त्यांनी दाखवले आहे," असं आदित्य ठाकरे म्हणाले.
विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाच्या आमदारांनी थेट शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनाच लक्ष्य केलं. शिंदे गटाच्या आमदारांनी विधीमंडळांच्या पायऱ्यावर आदित्य ठाकरे यांचे घोड्यावर उलट्या दिशेने बसलेल्या व्यंगचित्राचे बॅनर झळकावत घोषणाबाजी केली. बॅनरवर शिंदे गटाने 'महाराष्ट्राचे परम पूज्य (प पु) युवराज' असा बॅनर झळकावला. या बॅनरवर आदित्य ठाकरे यांचे घोड्यावर उलट दिशेने बसलेले व्यंगचित्र आहे. घोड्याचे तोंड हिंदुत्वाच्या दिशेने असून आदित्य यांचे तोंड महाविकास आघाडीकडे असल्याचे दाखवण्यात आले. वर्ष 2014 मध्ये 151 चा हट्ट करत युती बुडवली, 2019 मध्ये खुर्चीसाठी हिंदुत्वाची विचारधारा पायदळी तुडवली अशी घोषणा होती.
आम्ही मातोश्री आणि ठाकरे कुटुंबावर टीका करणार नसल्याचे वारंवारपणे शिंदे गटाकडून सांगण्यात येत होतं. मात्र, मागील दोन दिवसांपासून शिंदे गटाने मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केलं. शिंदे गटाने आज आदित्य ठाकरे यांच्यावर वैयक्तिक हल्ला चढवला. यावर उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "त्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसतेय, निराशा दिसतेय. म्हणून टार्गेट केलं जातं आहे."
आम्ही तुम्हाला काय कमी केलं? : आदित्य ठाकरे
"कोणताही खेळ खेळतो, त्यावेळी ज्याची भीती अधिक असते त्यावर स्लेजिंग केलं जातं. मंत्रिपदे मिळवण्यासाठी हे सगळं केलं जातंय, त्याची मला कीव येतेय. हे लोक प्रमाणिक माणसाच्या पाठीवर खंजीर खुपसून गेलेले आहेत. लोकांचे प्रश्न घेऊन बसले असते तर कौतुक वाटलं असतं," अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी घोषणाबाजी आणि बॅनरबाजी करणाऱ्या शिंदे गटातील आमदारांवर केला. तसंच आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला तरीही शिवसेना उभी राहिल. आमच्यावर टीका करत आहात, आम्ही तुम्हाला काय कमी केलं, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी यावेळी विचारला.
'लहान मुलाला देखील 50 खोक्यांचा अर्थ माहित आहे'
गद्दारी करुन निर्लज्जपणे सरकार पाडलं. प्रत्येक गल्लीतल्या लहान मुलाला देखील माहित आहे 50 खोक्यांचा अर्थ काय? अजित पवार तसंच आम्ही शेतकरी, महिलांचे प्रश्न उपस्थित करत आहोत. नवीन सरकारच्या पहिल्या प्रश्नोत्तरामधील पहिला प्रश्न राखीव ठेवण्यात आला. काल देखील आणखी एक प्रश्न राखीव ठेवला. यावरुन मंत्र्यांचा अभ्यास दिसत नाही. ते जनतेच्या प्रश्नांबाबद गंभीर दिसत नाही. म्हणून आम्ही 50 खोकेचा अर्थ काय हे लोकांना विचारतोय, आणि ते त्यांना झोंबलंय, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
Aaditya Thackeray : ... म्हणून आम्ही 50 खोकेचा अर्थ काय हे लोकांना विचारतोय, आणि ते त्यांना झोंबलंय
संबंधित बातमी