रोज सकाळी वाजणाऱ्या भोंग्याचे सेल आता संपले, श्रीकांत भारतीयांचा राऊतांना टोला, म्हणाले, EVM चे आरोप म्हणजे रडीचा डाव
निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता ईव्हीएमवर (EVM) आरोप करणे हा रडीचा डाव असल्याचे मत भाजप नेते श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiya) यांनी व्यक्त केले आहे.
Shrikant Bhartiya : निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता ईव्हीएमवर (EVM) आरोप करणे हा रडीचा डाव असल्याचे मत भाजप नेते श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiya) यांनी व्यक्त केले आहे. दुर्दैव म्हणजे राज्यातील शीर्षस्थ नेते शरद पवार यांनीही या सुरात सूर मिसळल्याचे भारतीय म्हणाले. राज्यात भाजप व महायुतीला मिळालेल्या विजयानंतर आज श्रीकांत भारतीयांनी विठ्ठल मंदिरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला.
रोज सकाळी वाजणाऱ्या भोंग्याचे सेल आता संपले
रोज सकाळी वाजणाऱ्या भोंग्याचे सेल आता संपले असल्याचा टोला देखील त्यांनी संजय राऊतांना लगावला. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी ईव्हीएम वर आरोप केले असते तर समजू शकलो असतो मात्र राज्यातील ज्येष्ठ आणि शीर्षस्थ नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते शरद पवार देखील यात सामील झाले हे दुर्दैव असल्याचे भारती यांनी सांगितले. राज्यातील जनतेने एवढा मोठा पराभव केल्याने हे रडीचे डाव खेळले जात आहेत असा टोला भारती यांनी लगावला.
मुख्यमंत्री भाजपचा होणार
मनोज जरांगे यांचा राजकीय फायदा घेण्यासाठी जे जे लोक भेटले त्या सर्वांना भाजप कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातल्या 9 कोटी जनतेने चांगला धडा शिकवल्याचा टोलाही भारती यांनी लगावला. राज्यात मिळालेलं यश हे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांच्या सामूहिक नेतृत्वाचे यश असल्याचे ते म्हणाले. राज्यात आता भाजपचं सरकार येत असून मुख्यमंत्री ही भाजपचा होणार आहे. रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्याबाबत भाजप जिल्हाध्यक्षांनी पक्षाध्यक्षांकडे लेखी तक्रार केली आहे. उमेदवार राम सातपुते यांनीही याबाबत तक्रार केल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावर गंभीरपणे कारवाई करतील असा इशारा भारती यांनी दिला आहे. जे जे चुकीचं वागलेत त्या सर्वांना त्यांची जागा दाखवली जाईल असेही त्यांनी सांगितले.
विरोधकांकडून EVM बद्दल संशय व्यक्त
महाराष्ट्र राज्य विधानसभेचे निकाल लागल्यानंतर विरोधकांकडून EVM बद्दल संशय व्यक्त केला जात आहे. देश विदेशातील जाणकार याबाबत आपले मत मांडत आहेत. तर विरोधक EVM मध्ये गैरप्रकार झाल्याचे सांगत आहे. अनेक पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी देखील केली आहे. अनेकांनी यासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळं या मुद्यावरुन सध्या आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.