(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला!
Vidhan Sabha Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत 125 जागांवर सहमती झाली असून राहिलेले जागावाटप देखील लवकरच पूर्ण होईल, अशीही माहिती काँग्रेस नेत्याने दिली आहे.
संगमनेर : आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) 125 जागांवर सहमती झाली असून राहिलेले जागावाटप देखील लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केलाय. गणेशोत्सवानंतर (Ganeshotsav 2024) चर्चा करून सर्वांच्या सहमतीने जागावाटप पूर्ण होईल. एमआयएमबाबत (MIM) प्रस्ताव आल्याची मला माहिती नाही. मात्र, जे काही निर्णय होतील ते उच्च पातळीवर होतील असं थोरात यांनी स्पष्ट केलंय. तर विधानसभा निवडणुकीत 180 पेक्षा जास्त जागा निवडून आल्या तर नवल वाटू देऊ नका, असेही वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत विचारले असता बाळासाहेब थोरात म्हणाले की, आमच्या दोन-तीन बैठका आत्तापर्यंत झाल्या आहेत. या बैठकीमध्ये 125 जागांवर सहमती असल्यास दिसून आलंय. इतर जागांवर लवकरच चर्चा करून निर्णय घेतला जाईल. एमआयएमबाबत कोणता प्रस्ताव दिलाय याची मला माहिती नाही. मात्र असं काही असेल तर त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच घेतला जाईल. आमचे जागा वाटप लवकरच पूर्ण होईल आणि राज्यात महाविकास आघाडी 180 पेक्षा जास्त जागा निवडून आल्या तर नवल वाटू देऊ नका, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
महायुतीत मैत्रीपूर्ण लढती नव्हे तर...
विधानसभा निवडणुकीत महायुतीत काही मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत विचारले असता बाळासाहेब थोरात म्हणाले की, महायुतीत मैत्रीपूर्ण लढती नव्हे तर खऱ्याखुऱ्या लढती सध्या सुरू आहे. त्यांच्यात सगळ्यांना पुढे जायचं आहे कोणी मागं जायला तयार नाही. आमच्या जागा वाटपात आम्ही देखील आग्रह धरू. मात्र जो काही निर्णय असेल तो सहमतीनेच घेतला जाईल. महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण? अशी चर्चा आम्ही कधीच करत नाही, असे त्यांनी म्हटले.
चंद्रचुड हे 'त्या' पलीकडचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत बुधवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी हजेरी लावत श्री गणेशाची आरती केली. याबाबत बाळासाहेब थोरात म्हणाले की, सरन्यायाधीश हे मोठं नाव आहे. ते महाराष्ट्रातील आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच वाटतो. न्यायव्यवस्थेवर सरकार दबाव टाकतं ही चर्चा सध्या सुरू आहे. मात्र चंद्रचुड हे त्या पलीकडचे आहेत, असे मला वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
उद्धव ठाकरेंची भूमिका योग्य
विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे मुस्लिम उमेदवार देणार असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत बाळासाहेब थोरात म्हणाले की, याबाबत उद्धव ठाकरेंनी कायम भूमिका मांडलेली आहे. ते धर्मात भेद करत नाहीत. देश विरोधी वागणाऱ्या मुस्लिमांच्या विरोधात आम्ही आहोत, हे उद्धव ठाकरे कायम सांगतात. त्यामुळे त्यांच्या भूमिकेचं निश्चित कौतुक केलं पाहिजे, त्यांनी योग्य अशी भूमिका घेतली आहे. मुस्लिमांना त्यांच प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे हे योग्य आहे आणि आमचा देखील तसा प्रयत्न राहील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आणखी वाचा
Ajit Pawar : 'अजितदादांकडून मविआच्या काळातही निधीवाटपात दुजाभाव', काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट