माढ्यात महायुतीतील वाद थांबायचं नाव घेईना; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तरच निंबाळकरांचा प्रचार करणार, शिवसेनेची भूमिका
माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीतील वाद आता काही थांबण्याचं नाव घेईनात, आता शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज असल्याचं समोर आलं आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तरच निंबाळकरांचा प्रचार करणार अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
Madha Lok Sabha Election : सोलापूर : माढाचे (Madha Lok Sabha) खासदार रणजित निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar) यांना गेल्यावेळी आम्ही जिंकून दिलं. मात्र, त्यांनी कधीही शिवसेनेला (Shiv Sena) विश्वासात घेतलं नसल्यानं शिवसैनिक खूप नाराज आहेत. आता उमेदवारांचा प्रचार करायचा असं मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) सांगितलं तर आम्ही प्रचार करू, अशी भूमिका शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात घेण्यात आली आहे. शिवसेनेच्या वतीनं सोलापूर संपर्क प्रमुख शिवाजी सावंत (Shivaji Sawant) सर यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्डूवाडी येथे रात्री शिवसेनेचा निर्धार मेळावा झाला. यावेळी सेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी रणजित निंबाळकर यांच्या विषयी नाराजी व्यक्त केली. आमच्या भागातील विकासकामं करताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही, असा सूर होता. पाच वर्षानंतर आता पुन्हा मतं द्यायची असतील तर मुख्यमंत्र्यांच्या कानावर आमची नाराजी घालणार आहोत. निंबाळकर यांनी आता विश्वासात घेवून काम करण्याची हमी दिली, तरच निर्णय घेणार असल्याचंही यावेळी संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी सांगितलं आहे.
यंदा भाजपनं 400 पारचा नारा दिला आहे. यावेळी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं असून 400 पार जाताना उमेदवाराची नाराजी योग्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याचंही यावेळी सावंत यांनी सांगितलं आहे. शिवाजीराव सावंत हे राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे ज्येष्ठ बंधू असल्यानं त्यांच्या नाराजीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.
माढ्यात आता शिवसेना नाराज, कार्यकर्त्यांची मोठी भूमिका
माढा तालुक्यात शिवसेनेची मोठी ताकद असून ही नाराजी भाजपला परवडणारी नाही. आता मुख्यमंत्र्याच्या सूचनेनंतर पुढची बैठक घेऊन निर्णय होईल, असं सावंत यांनी सांगितलं आहे. आम्हाला गेल्या निवडणुकीत ज्यांनी निंबाळकर यांना विजयी केलं, त्या सर्वात नाराजीचं कारण आमदार शिंदे बंधू आहेत. गेल्यावेळी संजयमामा शिंदेंच्या विरोधात या सर्वांनी निंबाळकर याना विजयी केलं. मात्र नंतर निंबाळकर यांनी शिंदे बंधुंशी जवळीक केल्यानं मोहिते पाटील यांच्यापासून सावंत यांचेपर्यंत निंबाळकर यांच्यावर नाराजी आहे. आता मुख्यमंत्री माढा लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांना काय सूचना देतात हे पाहणे महत्वाचे असून त्यानंतर ही नाराजी दूर होऊ शकणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :