Vande Bharat Express : भारतीय बनावटीची वंदे भारत ट्रेन लातूरच्या कोचमध्ये बनवली जाणार; देवेंद्र फडणवीसांची महत्वाची घोषणा
Vande Bharat Express : लातूर व मराठवाड्यासाठी (Marathwada) ही अभिमानाची बाब आहे असेही फडणवीस म्हणाले.
Vande Bharat Express : आज जालना रेल्वे स्थानकावरून जालना- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. दरम्यान, याचवेळी या रेल्वेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जालना (Jalna) ते छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) दरम्यानचा प्रवास केला. यावेळी बोलतांना फडणवीस यांनी महत्वाची घोषणा देखील केली आहे. “संपूर्ण भारतीय बनावटीची ही ट्रेन पुढील काळात लातूर (Latur) येथील कोचमधून बनवण्यात येणार आहे. लातूर व मराठवाड्यासाठी (Marathwada) ही अभिमानाची बाब आहे,” असे फडणवीस म्हणाले.
जालना येथील उद्घाटनाच्या कार्यक्रमास्थळी बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "जालना येथून आज वंदे भारत ही आधुनिक भारताची ट्रेन सुरू झाली आहे. याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार. वंदे भारत रेल्वे ही प्रगत राष्ट्रातील सर्व अत्याधुनिक सुविधांनीयुक्त रेल्वे प्रमाणे आहे. महाराष्ट्रात सध्या सहावी वंदे भारत ट्रेन जालन्यातून सुरू झाली आहेत. याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचेही आभार व्यक्त करतो. संपूर्ण भारतीय बनावटीची ही ट्रेन पुढील काळात लातूर येथील कोचमधून बनवण्यात येणार आहे. लातूर व मराठवाड्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. सध्या 160 प्रति तास किलोमीटरने जाणारी ही ट्रेन दोन वर्षात 250 प्रति तास किलोमीटरने धावेल. महाराष्ट्रात सध्या रेल्वेच्या पायाभूत सुविधांची रुपये एक लाख सहा हजार कोटींची कामे सुरु आहेत. यावर्षी 13 हजार कोटी रुपये राज्याला मिळाले आहेत. अशाप्रकारे रेल्वेचा अभूतपूर्व विस्तार करण्यात येत असल्याचे फडणवीस म्हणाले.
भारतामध्ये वंदे भारत रेल्वेंची संख्या 34 झाली आहे
याचवेळी बोलतांना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, "मराठवाड्यातील नागरिकांना राजधानी मुंबई येथे कामानिमित्ताने जाण्याची उत्तम सोय व्हावी या उद्देशाने जालना येथून वंदे भारत रेल्वेचा आज शुभारंभ करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर पासून ते जालना दरम्यानचे इलेक्ट्रीकचे काम पूर्ण झाले असल्याने जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी वंदे भारत रेल्वे सुरु करता आल्याने समाधान वाटत आहे. जालना-छत्रपती संभाजीनगर- नाशिक-ठाणे ते मुंबई असा या रेल्वेचा प्रवास असणार असून, प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा रेल्वेचा मानस आहे. या रेल्वेची 530 प्रवाशी क्षमता असून एकुण 8 डब्बे जोडले आहेत. भारतामध्ये वंदे भारत रेल्वेंची संख्या 34 झाली आहे. मनमाड ते छत्रपती संभाजीनगर या दरम्यानच्या रेल्वे दुहेरीकरणासाठी जवळपास 1 हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. मार्चपर्यंत काम सुरु होणार आहे आणि पुढील मार्गाचे सर्वेक्षण सुरु झाले आहे. त्यालाही पैसे उपलब्ध करुन दिले असल्याचे दानवे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
आता दणका दाखवतो! रेल्वे विभागाला इशारा देताच उद्घाटनाच्या पत्रिकेत इम्तियाज इम्तियाज यांचे नाव टाकले