![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mahayuti Lok Sabha Formula :महायुतीनं बारा मतदारसंघात भाकरी फिरवली, जाणून घ्या कुणा कुणाला दिली नव्यानं संधी?
Mahayuti Seat Sharing : महायुतीनं राज्यातील 48 उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या यादीवर नजर टाकल्यास 12 विद्यमान खासदारांना तिकीट नाकारण्यात आलं आहे.
![Mahayuti Lok Sabha Formula :महायुतीनं बारा मतदारसंघात भाकरी फिरवली, जाणून घ्या कुणा कुणाला दिली नव्यानं संधी? lok sabha mahayuti seat sharing bjp and shivsena denied ticket to 12 present member of parliaments marathi news Mahayuti Lok Sabha Formula :महायुतीनं बारा मतदारसंघात भाकरी फिरवली, जाणून घ्या कुणा कुणाला दिली नव्यानं संधी?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/05/fbaab626c2956c0431d1995ac86ccce01714883204781989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या(Maha Vikas Aghadi) जागा वाटपाचं चित्र स्पष्ट झालं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 21, काँग्रेसला 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांना 10 जागा असं जागा वाटप झालं. महायुतीचं जागावाटपाचं सूत्र अगदी अखेरच्या टप्प्यात समोर आलं. यामध्ये भाजपला (BJP) 28, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला (Shivsena) 15, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना एक असं महायुतीचं जागा वाटप पार पडलं. महायुतीच्या जागावाटपात जवळपास 12 खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे.प्रीतम मुंडे, गोपाळ शेट्टी, मनोज कोटक अशी प्रमुख नावं भाजपनं तिकीट कापलेल्या खासदारांची आहेत.एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून देखील विद्यमान खासदारांना नारळ देण्यात आला आहे.
एकनाथ शिंदेंनी कोणत्या खासदारांची तिकिटं कापली?
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला. यामध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघाचे कृपाल तुमाने,यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी, हिंगोलीचे हेमंत पाटील आणि मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार गजानन कीर्तिकर यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. गजानन कीर्तिकर सर्वात शेवटी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले होते.तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना हेमंत पाटील आणि भावना गवळी यांची उमेदवारी जाहीर करुन नंतर तिथं नवे उमेदवार द्यावे लागले होते.
कृपाल तुमाने यांच्या मतदारसंघात काँग्रेसमधून आलेल्या राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली. यवतमाळ वाशिमच्या लोकसभा मतदारसंघात भावना गवळी यांच्या जागेवर राजश्री पाटील, हेमंत पाटील यांच्या जागेवर बाबुराव कदम कोहळीकर आणि मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात गजानन किर्तीकर यांच्या मतदारसंघात आमदार रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीच्या जागावाटपात पालघर मतदारसंघ भाजपकडे गेल्यानं शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचा देखील पत्ता कट झाला आहे. त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल अशी आशा होती. पालघरमध्ये भाजपनं हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपनं किती ठिकाणी नवे उमेदवार दिले?
भाजपचे गेल्या लोकसभा निवडणुकीत 23 खासदार विजयी झाले होते. भाजपनं काही खासदारांचं तिकीट त्यांनी कापलं. यामध्ये बीडमधून प्रीतम मुंडे, सोलापूरमधून जयसिद्धेश्वर स्वामी,जळगावमधून उन्मेष पाटील, अकोला लोकसभा मतदारसंघात संजय धोत्रे, मुंबईतील तीन विद्यमान खासदारांचा पत्ता भाजपनं कट केला. यामध्ये पूनम महाजन, मनोज कोटक, गोपाळ शेट्टी यांना घरी बसवण्यात आलं.
बीडमधून पंकजा मुंडे, जळगावातून स्मिता वाघ, अकोल्यात अनुप धोत्रे, सोलापूरमध्ये राम सातपुते, मुंबईतून उज्ज्वल निकम, मिहीर कोटेचा आणि पियूष गोयल यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आलीय. तर, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त होती. तिथं पोटनिवडणूक झाली नाही. भाजपनं तिथं मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)