मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं, जागावाटपाचे वाद बसून सोडवा; महायुतीच्या बैठकीत अमित शाह नेमकं काय म्हणाले?
Lok Sabha Election : अमित शाह यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि जागावाटपाच्या बाबतीत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह दोनही उपमुख्यमंत्र्यांना काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर भाजपचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मंगळवारी महाराष्ट्राचा दौरा केला. यावेळी मुंबईत शाह यांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक झाली आहे. ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. दरम्यान, यावेळी बोलतांना शाह यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि जागावाटपाच्या बाबतीत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह दोनही उपमुख्यमंत्र्यांना काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत.
या बैठकीत बोलतांना शाह म्हणाले की, "देशात 400 प्लसचे टार्गेट डोळ्यासमोर ठेवून राज्यात महायुती म्हणून कामाला लागा. जागा वाटपावर जास्त चर्चा करत न बसता आपले मिशन मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे हे डोळ्यासमोर ठेवा. जागा वाटपात महायुतीत कुणावरही अन्याय होणार नाही. उमेदवार कुणीही असला तरी त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ही तीनही पक्षाची असेल. आपल्याला मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे, हे डोळ्यासमोर ठेवूनच निवडणुकीला सामोरे जा, काही जागाबाबत वाद असतील तर एकत्र बसून सोडवा अशा सूचना अमित शाह यांनी मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री यांना दिल्या आहेत.
भाजपा लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागावाटपाचा अजून अधिकृतरीत्या कोणतेही घोषणा झालेली नाही. मात्र, असे असतांना भाजपा लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम असल्याची माहिती मिळत आहे. भाजपा या 32 जागा लढवत असतांना काही जागांवर शिंदे गट आणि अजित पवार गट आग्रही असल्याच पाहायला मिळत आहे. महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात सुटेल अशी अपेक्षा होती. मात्र, अजूनही त्यावर अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती मिळत आहे.
'या' आठ जागांवरून वाद...
महायुतीत अनेक जागांबाबत निर्णय झाला आहे. मात्र, राज्यातील असे आठ लोकसभा मतदारसंघ आहेत, ज्यावरून महायुतीत एकमत होत नसल्याचे चित्र आहे. कारण या ठिकाणी एकाचवेळी दोन पक्षांनी दावा केला आहे. ज्यात, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ (Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha),कल्याण लोकसभा मतदारसंघ (Kalyan Lok Sabha),दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ (South Mumbai Lok Sabha),हिंगोली लोकसभा मतदारसंघ (Hingoli Lok Sabha),रामटेक लोकसभा मतदारसंघ (Ramtech Lok Sabha),रायगड लोकसभा मतदारसंघ (Raigad Lok Sabha) ,पालघर लोकसभा मतदारसंघ (Palghar Lok Sabha),सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ (Sindhudurg Lok Sabha) मतदारसंघांचा समावेश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :