Nagpur Congress : महागाई विरोधात शहर कॉंग्रेसमध्ये ऐक्य, आक्रमक नेते, कार्यकर्त्यांना पोलिसांनी व्हॅनमध्ये कोंबले
सभागृहात प्रश्न मांडू देत नाही. त्यामुळे आम्ही आंदोलन सुरू केले आहे. सरकारचे अन्याय थांबल्याशिवाय हे आंदोलन आता थांबणार नाही, असे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे म्हणाले.
नागपूर: एरव्ही नागपूर शहर कॉंग्रेसमधील आंदोलनात प्रत्येक गट वेगवेगळ्या स्टाइलमध्ये आपले आंदोलन करत असतो. मात्र कॉंग्रेसने पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनात गल्लीपासून दिल्लीपर्यंत कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्ता आक्रमक दिसून आले. याचीच प्रचिती नागपूर शहर कॉंग्रेसच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरील आंदोलनातून झाली. केंद्र सरकारतर्फे करण्यात येत असलेल्या ईडी (सक्तवसुली संचालनालय) कारवाया आणि वाढत्या महागाईच्या विरोधात कॉंग्रेसतर्फे आज आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले. तेव्हा पोलिसांनी नेते व कार्यकर्त्यांना अक्षरशः फरफटत नेऊन पोलिस व्हॅनमध्ये कोंबले.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी ईडीच्या माध्यमातून सोनिया गांधी यांना वारंवार चौकशीसाठी बोलावले जात आहे. त्यांची तब्येत आणि वयाचासुद्धा विचार केला जात नाही. एकाच प्रकरणासाठी वारंवार चौकशीसाठी का बोलावले जात आहे, याचे उत्तर मात्र ईडीतर्फे आजवर देण्यात आले नाही. सरळसरळ ईडी मोदी सरकारच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. फक्त काँग्रेस आणि विरोधकांनाच ईडी त्रास देत आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षातील नेत्यांवर कितीही भ्रष्टाचाराचे आरोप असले तरी त्यांची साधी चौकशी केली जात नसल्याचा आरोप काँग्रेसच्यावतीने करण्यात आला.
ठाकरेंच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर
शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचाही प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. आंदोलनात विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, प्रशांत धवड, संजय महाकाळकर, युवक कॉंग्रेसचे बंटी शेळके, प्रा.दिनेश बानाबाकोडे, शेख हुसैन, नंदा पराते, संदेश सिंगलकर, कमलेश समर्थ, गिरीश पांडव, नैश अली, रामगोविंद खोब्रागडे, प्रवीण आगरे, दिनेश तराळे, मिलिंद दुपारे, वासुदेव ढोके, महेश श्रीवास, अरुण डवरे, आशिष दीक्षित, रमण पैगवार, केतन ठाकरे, विना बेलगे, सुहास नानवटकर, सरफराज खान, राजेश पौनीकर, ज्ञानेश्वर ठाकरे, युवराज वैद्य, मोतीराम मोहाडीकर, प्रवीण गवरे, सुजाता कोंबाडे, स्नेहल दहीकर, गीता जळगावकर, मंदा वैरागडे, अर्चना बडोले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सभागृहातही प्रश्न मांडू देत नसल्याने आम्ही रस्त्यावर
आमचे नेते राहुल गांधी शेतकऱ्यांचे, गरिबांचे प्रश्न घेऊन लढत आहेत. त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून होतो आहे. जीएसटी वाढवून जनतेला लुटायचे आणि चौकशीच्या नावाखाली आमच्या नेत्यांची बदनामी करायची, असा प्रकार सध्या सुरू आहे. राहुल गांधींनी आधीच सांगितले आहे की, काय करायचे आहे, ते करा. मी भीणार नाही केंद्र सरकार आम्हाला राष्ट्रपतींकडे जाऊ देत नाही, सभागृहात प्रश्न मांडू देत नाही. त्यामुळे आम्ही आंदोलन सुरू केले आहे. सरकारचे अन्याय थांबल्याशिवाय हे आंदोलन आता थांबणार नाही, असे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे म्हणाले. पोलिसांनी आज आम्हाला कसं अडवलं, फरफटत नेऊन व्हॅनमध्ये कोंबलं, हे देशाने बघितलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात यापुढे आम्ही गनिमी कावा करू. पोलिस बळाचा वापर करून आमचा आवाज दाबण्याचा होत असलेला प्रयत्न आम्ही हाणून पाडू. या सरकारचे डोके ठिकाणावर आणल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही, असेही आमदार विकास ठाकरे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मोठा हंगामा करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.