(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jayant Patil : 'केवळ मोदींच्या हस्ते शिवरायांचा पुतळा उभारायचा होता, त्यांना दर्जाशी घेणं देणं नाही'; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Jayant Patil : नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. मात्र हा पुतळा दुर्दैवानं कोसळला आहे.
मुंबई : केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पुतळा उभारायचा हेच सरकारचे ध्येय होते. हे इव्हेंट सरकार आहे. त्यांना कामाच्या दर्जाचं घेणं देणं नाही. कमीशन घेणं आणि कंत्राट वाटणे एवढंच काम सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्य सरकारवर (Maharashtra Government) केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) शौर्याला सलाम म्हणून पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं होतं. मात्र हा पुतळा दुर्दैवानं कोसळला आहे. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
जयंत पाटलांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
जयंत पाटील म्हणाले की, ही घटना अत्यंत गंभीर आहे. महाराजांचा पुतळा बसवताना काळजी घेतली नाही. केवळ पंतप्रधान यांच्या हस्ते पुतळा उभारायचा हेच त्यांचे ध्येय होते. हे इव्हेंट सरकार आहे. त्यांना कामाच्या दर्जाचं घेणं देणं नाही. कमीशन घेणं आणि कंत्राट वाटणे एवढंच काम सुरू आहे. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत ही हेच झाले आहे. महाराजांचे नाव वापरायचे, पण काळजी घ्यायची नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
...अन्यथा राज्यभर आंदोलन करू : वैभव नाईक
तर याबाबत आमदार वैभव नाईक म्हणाले की, शिवाजी महाराजांचा पुतळा हा निकृष्ट कामामुळे कोसळला आहे. याबद्दल आम्हाला दु:ख होत असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. सहा महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून हा पुतळा उभरण्यात आला होता . ज्यावेळी काम सुरू होते त्यावेळी स्थानिक लोकांनी सुद्धा कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. पण त्यावेळी दुर्लक्ष करण्यात आले. जे विरोध करत आहेत ते आपल्या विरोधात आहे, असा समज करुन घेण्यात आला. 400 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या किल्ल्याचा एकही भाग ढासळला नाही, पण सहा महिन्यांपूर्वी केलेले येथील काम ढासळले. या प्रकरणी दोषींवर गुन्हे झाले पाहिजे अन्यथा आम्ही जिल्ह्यात नाही तर राज्यभर आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या