Sangli : राजारामबापू आणि वसंतदादा वर बसून चहा घेत असतील, जुने वाद उकरून काढण्याला अर्थ नाही; सांगलीच्या वादावर जयंत पाटलांचे स्पष्टीकरण
Jayant Patil On Sangli : सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेने बोलणं गरजेचं होतं, मी त्यावर कोणतीही चर्चा करणं योग्य नव्हतं असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.
सांगली : निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वाधिक चर्चेत आलेल्या सांगली लोकसभेच्या जागेवर (Sangli Lok Sabha Election) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पक्षाध्यक्ष जयंत पाटलांनी (Jayant Patil) पहिल्यांदाच मोठं वक्तव्य केलं आहे. राजारामबापू पाटील आणि वसंतदादा पाटील यांचे संबंध चांगले होते, वरती बसून ते आता एकत्र चहा घेत असतील, त्यामुळे जुन्या गोष्टी उकरून काढून वाद तयार करण्याला काहीही अर्थ नाही असं जयंत पाटील म्हणाले. आपण विशाल पाटलांच्या संपर्कात आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत असंही ते म्हणाले.
सांगलीतील जयंत पाटील यांचे वडील राजारामबापू पाटील आणि विशाल पाटील यांचे आजोबा वसंतदादा पाटील यांच्यामध्ये एकेकाळी राजकीय वैर होतं. त्यामुळे त्याचा फटका आता विशाल पाटलांना बसला असून राष्ट्रवादीचे शरद पवार आणि जयंत पाटील यांनी ही जागा शिवसेनेला दिली असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. विशाल पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्येही हीच चर्चा असून सोशल मीडियावर यासंबंधित मेसेजही व्हायरल होत आहेत. त्यावर आता जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं.
जयंत पाटील म्हणाले की, राजारामबापू आणि वसंतदादा वर बसून चहा घेत असतील. दोघे चांगले राजकारणी होते आणि दोघांचेही चांगले संबंध होते. असे असताना जुन्या गोष्टी उकरून वाद तयार करण्यात काही अर्थ नाही
एकच उमेदवार दिला तर भाजपला हरवणं शक्य
महाराष्ट्रातील परिस्थिती बदलत आहे, भाजपबद्दल लोकांच्या मनात वेगळा राग आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला यावेळी चांगल्या जागा मिळतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. जयंत पाटील म्हणाले की, सांगलीत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरु होत्या. राष्ट्रवादीने 10 जागा वर समाधान मानत आघाडी ठेवावी अशी भावना ठेवली. सांगलीची जागा शिवसेनेने मागितली होती. भाजपच्या विरोधात एकच उमेदवार विरोधात असावा आमचा प्रयत्न आहे, सांगलीत देखील तसेच व्हायला हवं होतं, तरच भाजपला हरवणं शक्य आहे.
विशाल पाटलांच्या संपर्कात
जयंत पाटील म्हणाले की, कोल्हापूर बाबतीत स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली. तर सांगलीच्या निर्णयाबद्दल मी बोलणे योग्य नाही. काही लोकांचे हेतू वेगळे असतात. सांगली बाबत त्या-त्या वेळी सगळे मी सांगितले आहे. सगळ्यानी एकसंधपणा दाखवले पाहिजे, मतांची विभागणी होऊ नये असं आपले मत आहे. मी विशाल पाटील यांच्या संपर्कात आहे, त्यांच्याशी बोलणार आहे. एक निवडणूक म्हणजे अंतिम नाही, अनेक निवडणुका लढवायच्या असतात. मोदींच्या, भाजपच्या विरोधात वातावरण असताना त्याचा फायदा घेतला पाहिजे. सर्वांनी समजूतदारपणा दाखवायला हवा. मताची विभागणी झाली तर महाविकास आघाडीला फटका बसणार.
सांगलीबाबत काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ आणि शिवसेना यांच्यात चर्चा होणे आवश्यक होते. मी राष्ट्रवादी पक्षाचा असल्याने त्यावर मी बोलणे उचित नव्हते. कोल्हापूरचे शाहू महाराज ज्या पक्षात जातील त्या पक्षाला ती जागा सोडवायची असे ठरले होते. आमचा सांगली जिल्ह्यात एकच आमदार त्यामुळे आम्ही दावा केला नाही असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.
महाविकास आघाडीच्या 32-33 जागा निवडून येतील
महाविकास आघाडीच्या 32 ते 33 जागा आजच निवडून आल्या आहेत असं जयंत पाटील म्हणाले. ते म्हणाले की, तोडफोड करणे, भ्रष्टाचार, पक्ष फोडणे याला राज्यातील जनता कंटाळाली आहे. कोणी कितीही मोठी भाषणं केली तरी महाराष्ट्रातील जनता यावेळी बदल घडवेल.
ही बातमी वाचा: