Sanjay Raut: शिवाजी महाराज अन् त्यांचे मावळे वरणभात, तूप खाऊन युद्ध लढत नव्हते, ते मांसाहार करायचे; मांसाहार बंदीवरुन संजय राऊत कडाडले
Kalyan Dombivli News: राज्यातील काही भागांमध्ये 15 ऑगस्टला चिकन, मटन आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. संजय राऊतांनी निर्णयाला कडाडून विरोध केला.

Non veg ban 15 August 2025 in Maharashtra: राज्यातील काही महानगरपालिका क्षेत्रांमध्ये 15 ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्यदिनी मांस, मच्छीची दुकाने बंद (Non veg Ban) ठेवण्याच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण झाला आहे. या मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बुधवारी महायुती सरकारला (Mahayuti) धारेवर धरले. 15 ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्यदिन आहे, हा धार्मिक उत्सव नाही. देशाला हे स्वातंत्र्य पंतप्रधान मोदी, अमित शाह किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळालेले नाही. तुमच्याकडे 15 ऑगस्टला चिकन आणि मटणाची दुकाने बंद ठेवा, अशी मागणी कोणी केली आहे का? हे काय नवीन थोतांड आहे, याचे जनक कोण, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे हे काय वरण-भात आणि तूप खाऊन युद्धावर जात नव्हते. ते चांगल्या प्रमाणात मांसाहार करायचे. बाजीराव पेशवेही मांसाहार करायचे. त्याशिवाय युद्ध लढता येत नाही. सीमेवरील भारतीय सैन्यातील जवानांनाही मांसाहार करावाच लागतो ना? वरण-भात, तूप पोळी, श्रीखंड खाऊन युद्ध लढता येत नाही. देवेंद्र फडणवीस तुम्ही महाराष्ट्राला नपूसंक आणि नामर्द करत आहात. तुम्हाला मांसाहार करायचा नसेल तर करु नका. पण तुम्ही लोकांनी महाराष्ट्राची बंदिशाळा बनवली आहे. लोकांनी याविरोधात आवाज उठवला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
हे सरकार रेडे कापून सत्तेत आले आणि त्या रेड्यांचा प्रसाद म्हणूनही खाल्ला गेला. कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये रेडे, बकरे कापून सत्तेत आलेल्यांना मांसाहाराचा तिटकारा का यावा? अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली. ते म्हणाले की 65 रेडे कापण्यात आले आणि रेडे कापल्यानंतर त्याचा प्रसाद म्हणून सुद्धा खावा लागतो ही तेथील परंपरा असल्याचे संजय राऊत म्हणाले. इतर प्राणी सुद्धा त्या ठिकाणी कापले जातात आणि त्यानंतर मांसाहार करावा लागतो. अशा सरकारचे जनक फडणवीस जर शाकाहारी व्हा म्हणून सांगत असतील तर थोतांडपणा बंद करा, असा टोला त्यांनी लगावला.
Kalyan Dombivli News: कल्याण-डोंबिवलीत 15 ऑगस्टला मांसाहार बंदी, नेमका आदेश काय?
कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त महापालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत 24 तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या तसेच मोठ्या जनावरांची कत्तल करणारे सर्व कत्तलखाने या कालावधीत बंद राहतील. हा निर्णय 19 डिसेंबर 1988 रोजीच्या प्रशासकीय ठरावाच्या आधारे घेण्यात आला असून, बाजार व परवाना विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी त्यास मान्यता दिली आहे. यासंदर्भात पालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने चालकांना नोटीस पाठवून 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आणखी वाचा
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे























