मोठी बातमी : इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा, विधानसभाही लढणार आणि लोकसभेची पोटनिवडणूकही लढणार, मतदारसंघही ठरले!
Imtiaz Jaleel, नांदेड : एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी नांदेडमधून लोकसभा निवडणूक तर छत्रपती संभाजीनगर मधून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
Imtiaz Jaleel, नांदेड : एमआयएमचे नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी मोठी घोषणा केली आहे. इम्तियाज जलील नांदेडमधून लोकसभा (Nanded Loksabha election) पोट निवडणूक लढवणार आहेत. तर विधानसभा निवडणूक छत्रपती संभाजीनगरमधून लढणार आहेत. एबीपी माझाशी बोलताना इम्तियाज जलील यांनी आगामी रणनीती बाबत भाष्य केलं आहे. दरम्यान, इम्तियाज जलील यांच्यामुळे कोणाला फटका बसणार? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.
इम्तियाज जलील काय काय म्हणाले?
इम्तियाज जलील म्हणाले, नांदेडमधून लोकसभा लढण्याची संधी आलेली आहे. लोकांमध्ये रोष पाहायला मिळतोय. मी महाराष्ट्रातील एकमेव मुस्लिम खासदार होतो. त्याला पाडण्यासाठी महाराष्ट्रातील लोकांनी कशी मेहनत घेतली होती, हे सर्वांना माहिती आहे. आमचे कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. एमआयएम हा पक्ष महाराष्ट्रात आल्यानंतर सर्वात जास्त प्रतिसाद आम्हाला नांदेडमध्ये मिळाला होता. आमच्यावर काही आरोप झाले तरी आम्ही घाबरत नाहीत. बी टीम आम्हाला म्हणतात, आम्ही हे आरोप गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आहोत. आता आम्ही या आरोपांना काडीचंही महत्त्व देत नाहीत. आम्हाला संधी आल्यानंतर आम्ही दिवंगत खासदाराबाबत का विचार करु? आम्ही आमच्या पक्षाबाबत विचार करणार आहोत. आम्ही कसं निवडून येऊ शकतो, हा विचार करणार आहोत.
वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर नांदेडमध्ये पोटनिवडणूक
काँग्रेस नेते वसंतराव चव्हाण यांनी भाजप उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव करत नांदेड लोकसभेतून दिमाखदार विजय मिळवला होता. अशोक चव्हाण यांच्यासारखे दिग्गज नेते भाजपसोबत असल्यामुळे नांदेडमध्ये झालेल्या भाजपचा पराभव महाराष्ट्रभर चर्चेला गेला. दरम्यान, मोठा विजय मिळवल्यानंतर खासदार वसंत चव्हाण यांचे तीन महिन्यानंतर निधन झाले. त्यामुळे नांदेडमध्ये पोट निवडणूक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीबरोबरच नांदेडच्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे.
काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना नांदेडमधून उमेदवारी
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली. महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल हाती येणार आहे. दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीबरोबरच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. काँग्रेसकडून दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देऊन मोठी खेळी केल्यानंतर आता इम्तियाज जलील यांनीही शड्डू ठोकलाय. ते नांदेडमधून लोकसभा पोटनिवडणूक लढणार आहेत.
इम्तियाज जलील काय म्हणाले?
इतर महत्त्वाच्या बातम्या
दिल्लीतून पत्र, काँग्रेसकडून 2 उमेदवारांची घोषणा; नांदेड लोकसभेसाठी रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी