Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री झाल्यावर लोक सत्तेसाठी हपापलेला नेता म्हणतील, ही भीती होती; फडणवीसांनी सांगितली मनातली घालमेल
Ideas Of India By ABP Network: देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला कसे तयार झाले? मनात सुरु असलेली घालमेल. फडणवीसांच्या मनातील घालमेल केंद्रीय नेत्यांनी दूर केली
मुंबई: एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकार स्थापन केल्यानंतर मी प्रथम उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला तयार नव्हतो. मी मुख्यमंत्री राहिल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले तर लोक मला सत्तेसाठी हपापलेला नेता म्हणतील, अशी शंका माझ्या मनात होती. पण भाजपच्या (BJP) केंद्रीय नेत्यांशी बोलल्यानंतर माझ्या मनातील ही शंका दूर झाली आणि मी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. ते शुक्रवारी एबीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया' या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर बोलत होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्ताबदलानंतर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारताना मनात सुरु असलेली घालमेल सर्वांसमोर मांडली. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझा होता. त्यामुळे याबाबत मला तयार करण्याचा प्रश्नच नव्हता. मी आमच्या नेत्यांकडे गेलो आणि त्यांना सांगितले की, आपल्याला हे सरकार मजबुतीने चालवायचे असेल आणि आपल्यासोबत येणाऱ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करायचा असेल तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे लागेल. त्यावेळी भाजप सर्वाधिक मोठा पक्ष होता. त्यामुळे केंद्रीय नेत्यांना आपण आपला मुख्यमंत्री बसवू शकतो, असे वाटत होते. परंतु, थोडा विचार केल्यानंतर केंद्रीय नेत्यांनी माझ्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे फडणवीसांनी सांगितले.
फडणवीस उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला कसे तयार झाले?
त्यावेळी मी केंद्रीय नेत्यांना एक गोष्ट सांगितली होती की, मी सत्तेबाहेर राहू इच्छितो. मला माझी प्रतिमा अशी होऊन द्यायची नव्हती की, काल मी मुख्यमंत्री होतो आणि आता उपमुख्यमंत्री झालो तर लोक मला सत्तेसाठी हपापलेला नेता म्हणतील. ही शंका माझ्या मनात होती. केंद्रीय नेत्यांनी माझ्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. पण ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचे ठरले तेव्हा केंद्रीय नेत्यांनी पुन्हा माझ्याशी चर्चा केली. त्यांनी मला सांगितले की, सरकार चालवायचं असेल तर ते बाहेरुन चालवता येत नाही. तुम्ही समांतर संवैधानिक व्यवस्था म्हणून काम करु शकत नाही. नाहीतर युपीए सरकारप्रमाणे आपली अवस्था होईल. त्यामुळे एक नेता म्हणून तुमच्या मनात शंका असेल, तरीही एक कार्यकर्ता म्हणून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारा. कारण तुम्ही आतमध्ये असाल तरच हे सरकार व्यवस्थित चालेल. त्यामुळे मी पक्षादेश मानून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्यावेळी लोक काय म्हणतील, हा प्रश्न माझ्या मनात कायम होता. पण मी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देशभरातून जो प्रतिसाद मिळाला तेव्हा माझ्या मनातील शंका दूर झाली. आज मी विचार करतो तेव्हा मला वाटते की, मी आतमध्ये असल्यामुळेच सरकार चालवणे सोपे आहे, असे फडणवीसांनी सांगितले.
आणखी वाचा
लोकसभा निवडणुकीत तुम्ही किती जागा जिंकणार, देवेंद्र फडणवीसांनी किमान जागांचा आकडा सांगितला