Sanjay Raut : मला नातवंडं, तुरुंगात जायचं वय नाही, राऊतांच्या त्या दाव्यावर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'मी तर माझं काम करून मोकळा...'
Sanjay Raut : बाळासाहेबांच्या नावाला ज्यांनी बट्टा लावला, ते तुमच्या असंच खोटं बोलणार", असं एकनाथ शिंदे संजय राऊतांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना म्हणालेत.

मुंबई : राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत असल्याचं चित्र आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचं चित्र आहे. एकीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आणि अजित पवारांची आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्या एकत्रिकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत 'माझा कट्टा' कार्यक्रमात खळबळजनक दावा केला आहे. आमचा अयोध्येचा दौरा (2022) होता. शिवसेनेचे सर्व नेते अयोध्येला गेले होते. शेवटचा दौरा होता.त्यानंतर ते गेले (फुटले). तेव्हा ते माझ्या खोलीमध्ये येऊन मला कन्व्हिन्स करत होते. ते घाबरुनच तिकडे गेले. एकनाथ शिंदे म्हणाले, माझं तुरुंगात जायचं वय नाही. बहुतेक हे मी पुस्तकात लिहिलंय. हे माझं तुरुंगात जायचं वय नाही, आता मला नातवंडं झाली आहेत. मी म्हटलं मला पण नातवंडं झाली आहेत, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला, त्यावरती एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
बाळासाहेबांच्या नावाला ज्यांनी बट्टा लावला
"ते काय म्हणाले त्याबाबत त्यांनाच विचारा. मला का विचारत आहात. मी तर माझं काम करून मोकळा झालो. बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडून कोणाशी सोयरीक केली, जे बाळासाहेब ठाकरेंना कधीच नको होतं, त्यांच्यासोबत तुम्हा सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी गेलात, त्यामुळे आम्ही त्यावर काय बोलणार. बाळासाहेबांच्या नावाला ज्यांनी बट्टा लावला, ते तुमच्या कट्ट्यावर येऊन असंच खोटं बोलणार", असं एकनाथ शिंदे संजय राऊतांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना म्हणालेत.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे हा माझा अत्यंत जवळचा मित्र. तो मला पण सांगत होता की तू पण चल. आमचा अयोध्येचा दौरा (2022) होता. शिवसेनेचे सर्व नेते अयोध्येला गेले होते. शेवटचा दौरा होता.त्यानंतर ते गेले (फुटले). तेव्हा ते माझ्या खोलीमध्ये येऊन मला कन्व्हिन्स करत होते. ते घाबरुनच तिकडे गेले. एकनाथ शिंदे म्हणाले, माझं तुरुंगात जायचं वय नाही. बहुतेक हे मी पुस्तकात लिहिलंय. हे माझं तुरुंगात जायचं वय नाही, आता मला नातवंडं झाली आहेत. मी म्हटलं मला पण नातवंडं झाली आहेत. ज्या पक्षाने तुम्हाला इतकी वर्ष दिलं आहे, त्यांच्या छातीवर पाय ठेवून बाहेर पडणं हे म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांना प्रतारणा केल्यासारखं आहे. तुम्ही सुद्धा धीर धरा, शांत राहा आणि घाबरु नका. आता हे ज्यावेळी मी सांगतो, त्यावेळी पक्ष फुटला का? ते डरपोक लोक आहेत म्हणून गेले, असं संजय राऊत म्हणाले.
राज आणि उद्धव एकत्र येणारच
यावेळी संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणारच असा दावा केला. राज आणि उद्धव हे दोघे भाऊ आहेत, दोघे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. दोघे एकत्र येतील हा मला विश्वास आहे. इतरांनी कुणी कितीही काहीही केलं तरी हे दोन्ही भाऊ एकत्र येतील असं संजय राऊत म्हणाले.
वीज चमकेल
राज आणि उद्धव हे दोघे एकत्र येतील आणि वीज चमकल्यासारखं राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण होईल. ज्यादिवशी वीज चमकेल त्यादिवशी महाराष्ट्राचे राजकारण बदलून जाईल. त्यामुळे दोन्ही भावांची ताकद राहिली नाही असं म्हणणाऱ्यांना ताकद दिसून येईल, असं संजय राऊत म्हणाले. राज आणि उद्धव एकत्र आल्याने काहीही फरक पडणार नाही असं भाजपकडून म्हटलं जात आहे, त्यांना संजय राऊत यांनी उत्तर दिलं.
कॅफेवर जाणार का?
राज ठाकरे यांना भेटण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते त्यांच्या घरी जात. त्यावर टीका करताना संजय राऊत यांनी अनेकवेळा कॅफे असा उल्लेख केला होता. आता राज-उद्धव यांच्या युतीसाठी पुढाकार घेण्यासाठी तुम्ही कॅफेवर जाणार का असा खोचक सवाल संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत म्हणाले, मला जायला काही अडचण नाही, राज ठाकरेही येतील. शिवाय आम्ही राजकारणी जे शब्दप्रयोग वापरतो (कॅफे) त्याचा शब्दश: अर्थ घेऊ नका असं अप्रत्यक्ष संजय राऊत यांनी सांगितलं.


















