(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जावई कुणाचाय, तुम्ही विधानसभेत पाठवा, मी..; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांना मंत्रीपदाचे संकेत
शरद पवारांनी आपल्या भाषणातून हर्षवर्धन पाटील व सहकार क्षेत्रावर भाष्य केलं. हर्षवर्धन पाटील यांच्यामुळे इंदापूरमधील ही पोकळी भरून निघेल.
पुणे : भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan patil) यांनी आपली कन्या अंकिता पाटील आणि कार्यकर्त्यांसह सोमवारी इंदापूरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Sharad Pawar) प्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर विजयसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, उत्तमराव जानकर अशा बड्या नेत्यांची हजेरी होती. या कार्यक्रमात बोलताना सुरुवातीलच हर्षवर्धन पाटलांनी लोकसभा निवडणुकीत आपण सुप्रिया सुळेंसाठी गुपितपणे काम केल्याचं त्यांनी म्हटलं. तर, शरद पवारांनीही (Sharad pawar) हर्षवर्धन पाटील यांच्यावर स्तुतीसुमने उधळत ते बारामतीचेच जावई आहेत, आम्ही कुणालीही आमच्या मुली देत नाहीत, असेही त्यांनी म्हटलं. यावेळी, इंदापूरच्या जनतेला आवाहन करताना, तुम्ही विधानसभेत पाठवा, राज्याची जबाबदारी द्यायचं काम माझं, असे म्हणत हर्षवर्धन पाटील यांना मंत्रीपदाचे संकेत दिले आहेत.
शरद पवारांनी आपल्या भाषणातून हर्षवर्धन पाटील व सहकार क्षेत्रावर भाष्य केलं. हर्षवर्धन पाटील यांच्यामुळे इंदापूरमधील ही पोकळी भरून निघेल, हर्षवर्धन पाटील आणि आमचा पक्ष वेगळा होता. पण, धोरणात कधी मतभेद नव्हते. जेव्हा नवीन काही करायचे असेल आणि जबाबदारी द्यायची असेल तर हर्षवर्धन यांचे नाव पहिलं यायचं. साखर कारखान्या संदर्भात ज्यावेळेस अडचण यायची त्यावेळेस मी हक्काने सांगायचो की हर्षवर्धन आपला माणूस आहे, तिथं पक्ष वेगळा असला तरी देखील. हर्षवर्धन पाटील यांच्याकडे बघून मला सारखं वाटायचं हा रस्ता चुकला. भाऊंनी आपल्याला दाखवले तेच आपलं घर, निर्णय घ्यायला वेळ लागला पण निर्णय घेतला. हा फक्त इंदापूर पुरता मर्यादित नाही, परंतु साखर व्यवसायाला चांगला दिवस आणणारा निर्णय असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले.
शरद पवारांकडून मंत्रिपदाचे संकेत
हर्षवर्धन पाटील म्हणाले काहीही काम द्यावं. पण , काहीही कामासाठी हर्षवर्धन यांची गरजच काय, लोकांच्या हिताचं काम, कठीण कामे हर्षवर्धन पाटील यांच्याकडे द्यायला पाहिजेत. त्यासाठी, तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये पाठवा. मला स्वतः साठी काहीही मागायचं नाही, मला महाराष्ट्र बदलायचा आहे, महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. त्यामुळे, हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेमध्ये पाठवायचे तुमचं काम, राज्याची जबाबदारी काय द्यायचं ही माझी जबाबदार, असे म्हणत महाविकास आघाडीचं सरकार आल्यास मंत्रिपदाचे संकेतही शरद पवारांनी दिले आहेत. काहीजण लोकं मला विचारत होते, कसं होणार, काय?, पण मी म्हटलं, काही काळजी करू नका, जावई कुणाचाय?, शरद पवारांनी असं म्हणतात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तसेच, आम्ही चांगलं घर बघूनच मुलींना देत असतो, त्यामुळे घर आम्हाला चांगलं मिळालंय, संसार नीट करणारा, महाराष्ट्राचा संसार नीट सांभाळणारा हा जावई आहे, जो बारामतीकरांनी तेव्हाच पाहिला होता, असे म्हणत शरद पवारांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
हेही वाचा
इंदापूरला निघण्यापूर्वीच फोन, शरद पवारांनी सांगितला किस्सा; रामराजेही अजित पवारांना देणार धक्का?