Jitendra Awhad Arrest : शिवरायांवरील चुकीच्या चित्रपटाचा विरोध केला म्हणून आव्हाडांना अटक झाली असेल तर आम्हाला त्यांचा अभिमान : सुप्रिया सुळे
जितेंद्र आव्हाड यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील चुकीच्या चित्रपटाचा विरोध केला म्हणून अटक झाली असेल तर आम्हाला त्याचा अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
Jitendra Awhad Arrest : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना आज (11 नोव्हेंबर) ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. जितेंद्र आव्हाड यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील चुकीच्या चित्रपटाचा विरोध केला म्हणून अटक झाली असेल तर आम्हाला त्याचा अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली. "जितेंद्र आव्हाड यांनी अशी थेरं केली तर त्यांना आयुष्यभर जेलमध्ये ठेवलं पाहिजे," अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी दिली. तर भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेचं स्वागत केलं आहे. त्यांच्यावरील कारवाई अत्यंत योग्य असल्याचं त्यांनी म्हटलं. याउलट
जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला 'हर हर महादेव' चित्रपटाचा शो बंद पाडला होता. शिवाय यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली. या अटकेनंतर आपण जामीन घेणार नसल्याचे आव्हाड यांनी 'एबीपी माझा' सोबत बोलताना सांगितलं.
हा पोलिसी बळाचा गैरवापर : जितेंद्र आव्हाड
शिवाय त्यांनी ट्वीट देखील केलं आहे. यामध्ये ते म्हणतात, "आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हाला अटक करावी लागेल. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही.
आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 11, 2022
जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेवर आलेल्या प्रतिक्रिया पाहूया...
सुप्रिया सुळे म्हणतात...तर आम्हाला जितेंद्र आव्हाडांचा अभिमान
जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेची माहिती सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना फारशी नव्हती. जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेबाबतच्या प्रतिक्रियेसाठी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "अटक केली? खरंच? माहिती काढा. कुठल्या सेक्शन अंतर्गत अटक केली? बघूया माहिती काढूया." असं सुप्रिया सुळे आधी म्हणाल्या. यानंतर सुप्रिया सुळे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, "महाराष्ट्राचं पोलीस दल चांगलं आणि माझा दलावर पूर्ण विश्वास आहे. कोणाचा फोन आला मला माहित नाही, पण वरुन मोठा दबाव आहे, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. जर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत काही चुकीचं दाखवलं जातं त्याचा विरोध केल्यास अटक केली जाते. या कारणामुळे जितेंद्र आव्हाड यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं आणि जेलमध्ये टाकलं, याचं मी मनापासून स्वागत करते. छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी देवाच्या स्थानी आहेत. छत्रपतींबाबतीत जर काही चुकीचं बोललं जात असेल, त्याच्याविरोधात जितेंद्र आव्हाड काही सांगू इच्छितात, त्यासाठी जर हे सरकार त्यांना जेलमध्ये टाकत असेल, तर आम्ही देखील जेलमध्ये जाण्यास तयार आहोत. आम्ही संपूर्ण ताकदीने जेलभरो आंदोलन करु. ज्याप्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत जे चुकीचं म्हटलं जात आहे, त्याचं राज्याचं सरकार समर्थन करत असेल तर त्यांनी समोर येऊन खुलेपणाने करावं."
...तर त्यांना आयुष्यभर जेलमध्ये ठेवलं पाहिजे : संदीप देशपांडे
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावरील कारवाईचं स्वागत केलं आहे. "कायदा आपलं काम करत आहे. ज्यापद्धतीने तुम्ही एका क्षेत्रात जाता, प्रेक्षकांना मारहाण करता ते चुकीचं आहे. सूडबुद्धीने कारवाई करण्याचा प्रश्नच नाही. अशी थेरं करत असतील तर त्यांना आयुष्यभर जेलमध्ये ठेवलं पाहिजे. आधीही मंत्री असताना एकाला घरी बोलावून मारहाण केली होती. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केली होती. अविनाश जाधव तिथे गेले होते. कारवाई होतेय ही चांगली गोष्ट आहे," अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
आव्हाडांवरील कारवाई अत्यंत योग्य आणि स्वागतार्ह : अतुल भातखळकर
अत्यंत योग्य कारवाई आहे. स्वागतार्ह कारवाई आहे. एकतर सार्वजनिक ठिकाणी जाणं, लोकांना मारहाण करणं. जर सिनेमाविषयी आक्षेप असेल तर सेन्सॉर बोर्ड, पोलिसांकडे तक्रार करता आली असती. स्वत: लॉ मेकर असताना कायदा हातात घेणं ही आव्हाडांची जुनी सवय आहे, खोड आहे. मंत्री असताना त्यांनी मारहाण केली होती. त्यावेळीही आम्ही हायकोर्टात गेल्यानंतर त्यांना अशीच अटक केली होती. यावेळी हायकोर्टात जाण्याची वेळ आली नाही, कारण एक सक्षम, कार्यक्षम सरकार राज्यात आहे. त्यामुळे आव्हाडांना अटक केली ही स्वागतार्ह बाब आहे. या राज्यात कोणीही कायदा हातात घेऊ शकणार नाही. सगळ्यांना कायद्याच्या राज्याप्रमाणे वागावं लागेल, हे आव्हाडांनी लक्षात ठेवावं. आव्हाडांनी हे उद्योग का केले हे अधिक महत्त्वाचं आहे. त्या सिनेमावर आव्हाडाचं खरा आक्षेप काय होता, कारण त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला हे दाखवलं याच्यामुळे आव्हाडांच्या मनात खदखद आहे. त्यामुळे त्यांनी खऱ्या अर्थाने चित्रपटाला विरोध केला होता.
VIDEO : जितेंद्र आव्हाड यांच्या अटेकवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
सरकारडून आव्हाडांवर राग काढण्यास सुरुवात : जयंत पाटील
जितेंद्र आव्हाड आणि काही लोकांनी हर हर महादेव चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची मोडतोड केल्याचं दाखवलं त्याचा निषेध केला. छत्रपती शिवरायांवर श्रद्धा असणारा कोणीही व्यक्ती हे सहन करणार नाही. त्यामुळे जितेंद्र आव्हाड असो किंवा अनेक जण चित्रपटाचा विरोध करण्यासाठी पुढे येत आहे. मूलभूत बदल दाखवण्याचा प्रयत्न चित्रपटात केला आहे, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात चालू शकत नाही. यातू संतापाची लाट उसळली आणि त्यातून काही घटना घडली. घटना झाल्यानंतर आधी दोन कलमं लावली होती. आता आणखी एक कलम ओढूनताणून लावलं आहे. सरकारने चित्रपट बनवणाऱ्यांना जाब विचारण्याच्या ऐवजी जे निषेध व्यक्त करत आहेत त्यांना अटक करण्याचं काम हे सरकार करत आहे. जितेंद्र आव्हाडांनी हे काम केलेले नाही. सरकारने जितेंद्र आव्हाडांचा राग काढण्याचा प्रयत्न केला आहे
हम करे सो कायदा असं आव्हाडांना वाटतं का? : किरीट सोमय्या
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावरील कारवाईचं स्वागत केलं आहे. "आव्हाड थिएटरमध्ये घुसतात. पत्नीसमोर मारतात. चित्रपटगृहात मारहाण करतात. मी देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकारचे कौतुक करतो. आव्हाड हेच मंत्री आहेत स्वतःचे बॉडीगार्ड पाठवून मारलं होतं. त्यावेळी ठाकरे सरकारने अटकेपासून संरक्षण केलं होतं. या प्रकरणात पण जितेंद्र आव्हाड यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. हे माफिया सरकार नाही. हम करे सो कायदा असं आव्हाडांना वाटतं का? असं किरीट सोमय्या म्हणाले.
पोलिसांनी जाणूनबुजून अटक केली : रोहित पवार
"ज्या प्रेक्षकाला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला तोच प्रेक्षक म्हणतोय की, “आव्हाड साहेबांची काहीच चूक नव्हती, उलट त्यांनी माझी मदत केली, त्यांना पोलिसांनी जाणून बुजून अटक केली आहे. यावरुन भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली.
ज्या प्रेक्षकाला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला तोच प्रेक्षक म्हणतोय की, “आव्हाड साहेबांची काहीच चूक नव्हती, उलट त्यांनी माझी मदत केली, त्यांना पोलिसांनी जाणून बुजून अटक केली आहे”. यावरून भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. pic.twitter.com/QIAmdswMST
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 11, 2022