(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gulabrao Patil : लोकसभेच्या निकालाने आलेली सूज विधानसभा निवडणुकीत उतरेल, गुलाबराव पाटील यांचा राहुल गांधींना टोला
Maharashtra News : लोकसभेच्या निकालाने आलेली सूज विधानसभा निवडणुकीत उतरेल, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी राहुल गांधी यांच्या कथित पंढरपूर दौऱ्यावरही मार्मिक शेरेबाजी केली आहे.
पंढरपूर : गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी राहुल गांधी (Rahul Gadhi) यांच्या कथित पंढरपूर दौऱ्यावर मार्मिक शेरेबाजी केली आहे. आम्ही सिझनेबल पुढारी नाही, त्यांना विठ्ठलाला काहीतरी मागायचं असेल. आम्ही मात्र देवाने दिले तरी येतो आणि नाही दिले तरी येतो, असा टोला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पंढरपूर दौऱ्याबाबत लगावला. मी गेले 31 वर्षे अखंड वारी करीत असून आम्हाला देवाजवळ काही मागायचे नसते, असे सांगितले . लोकसभेचे निकाल हे असे का आले, हे सगळ्यांना माहित असून ही फक्त सूज आहे, जी येत्या विधानसभा निवडणुकीत दिसेल, असा टोला विरोधकांना लगावला. आज विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला आले असता गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.
गुलाबराव पाटील यांचा राऊतांवर निशाणा
यावेळी बोलताना संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना, हे भूत आमच्यामुळे निवडून आले, याला स्वतःला पोरं होत नाहीत म्हणून दुसऱ्याच्या पोरांना दत्तक घेण्याची धडपड करीत असल्याचा टोला पाटलांनी लगावला. तो कुबुद्धीचा माणूस असून त्याला कधीच सुबुद्धी येणार नसल्याचा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला . या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होणार असून त्यासाठी प्रत्येक उमेदवाराला लागणाऱ्या 23 मतांच्या कोटा एवढी मते आम्ही जुळविल्याचा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी यावेळी केला.
फक्त 11 जागा जिंकल्या तरी आमचे सरकार येईल
आम्ही लोकसभेला 400 पार गेलो की त्यांना जणू हद्दपार करणार, संविधान बदलणार असा प्रचार केला गेला. मात्र ही सूज आता विधानसभेला राहणार नसून आताच्या लोकसभा निवडणुकीतही आम्ही 133 जागांवर आघाडीवर असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. आम्हाला फक्त 11 जागा जिंकल्या तरी आमचे सरकार येईल, असे सांगत विधानसभेला होणारे मतदान हे वैयक्तिक संबंध आणि केलेल्या कामावर मिळत असते, असे सांगितले. माझ्या मतदारसंघात 80 टक्के मुस्लिम आणि 90 टक्के दलित समाज मला मतदान करतो, तुम्ही केव्हाही जाऊन तपास असाही दावा पाटलांनी यावेळी केला आहे.
जरांगे पाटलांवर गुलाबराव पाटलांची भूमिका
मनोज जरांगे पाटील यांनी 288 उमेदवार उभे करणार किंवा 288 उमेदवार पाडणार या वक्तव्यावर बोलताना त्यांच्या मागण्याबाबत मुख्यमंत्री काम करीत असल्याचे सांगितले. मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखे कोणीही दिले नाही असे सांगताना मराठा समाजाला टिकणारे 10 टक्के आरक्षण एकनाथ शिंदे यांनीच दिले, असे पाटील यांनी सांगितले. जरांगे यांच्या सगेसोयरे मागणीबाबत मुख्यमंत्री ओबीसी समाजाशी चर्चा करून मार्ग काढतील, असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.