गुजरातच्या GST कमिशनरनं महाबळेश्वरमध्ये 620 एकर जमीन बळकावली; कारवाई कधी? वडेट्टीवारांचा थेट सभागृहात सवाल
Vijay Wadettivar on Jhadani Land : विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी झाडाणीतील जमीनीचा मुद्दा काढत थेट प्रश्नच उपस्थित केला. झाडणीची जमीन बळकावणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई कधी? असा प्रश्न वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय.
Vijay Wadettivar on Jhadani Land : मुंबई : काही दिवसांपूर्वी गुजरातमधील (Gujarat) अहमदाबादच्या जीएसटी कमिशनरने (Ahmadabad GST Commissioner) संपन्न आणि अनेक दुर्मिळ वनस्पती-प्राण्यांचा अधिवास असलेले झाडाणी हे संपूर्ण गावच बळकावलं असल्याच्या चर्चा होत्या. त्यासंदर्भात एबीपी माझानं बातमीही प्रसिद्ध केली होती. गुजरातमधील अहमदाबादच्या जीएसटी कमिशनरनं एक, दोन एकर नाहीतर तब्बल 640 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केलेला. एबीपी माझानं दाखवलेल्या याच बातमीचे पडसाद विधानसभेतही उमटल्याचं आज पाहायला मिळालं.
विधानसभेत आज अधिकारी अनुपस्थित असल्याचा मुद्दा गाजला. या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचंही पाहायला मिळालं. त्यावेळी बोलताना विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी झाडाणीतील जमीनीचा मुद्दा काढत थेट प्रश्नच उपस्थित केला.
झाडाणी गावात गुजरातमधील अहमदाबादच्या जीएसटी कमिशनरनं जमीन खरेदी केल्याची बातमी काही दिवसांपूर्वी एबीपी माझावर प्रसिद्ध करण्यात आली होती. या अधिकाऱ्यानं खरेदी केलेली जमिन थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 640 एकरांची होती. सध्या गुजरातमध्ये कार्यरत असलेले आणि मूळचे नंदुरबारचे असलेले भारतीय महसूल सेवेतील अधिकारी चंद्रकांत वळवी (Chandrakant Valvi IRS) यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या भागातील तब्बल 620 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केलेला. याच मुद्द्यावरुन विधानसभेत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरुन सभागृहात पेटलेला मुद्दा थेट महाबळेश्वरमधीस झाडाणी गावातील जमिनीपर्यंत जाऊन पोहोचला.
विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार बोलताना म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात झडाणी नावाचे गाव आहे तिथे 640 एकर जमीन खरेदी केली गेली. गुजरातच्या जिएसटी प्रमुख आहे त्यांनी जमीन विकत घेतली. सर्व नियम पायदळी तुडवले. करोडो रुपयांचा महसूल बुडवला. एवढी मस्ती आणि दादागिरी. मुख्यमंत्री पर्यावरणाच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील आहेत. आम्ही जेव्हा पत्र पाठवलं, तेव्हा महुसल विभागानं थातुर मातुर उत्तर दिलं. कुठलीही परवानगी दिली नाही. गुजरात जिएसटीचा आधिकारी आहे, त्याच्यावर काय कारवाई होणार? खेड आणि मावळच्या दोन प्रतांचे अधिकार काढले गेले."
प्रकरण नेमकं काय?
गुजरातमधील अहमदाबादच्या जीएसटी कमिशनरनं (Ahmadabad GST Commissioner) संपन्न आणि अनेक दुर्मिळ वनस्पती-प्राण्यांचा अधिवास असलेले झाडाणी हे संपूर्ण गावच बळकावल्याची चर्चा आहे. सध्या गुजरातमध्ये कार्यरत असलेले आणि मूळचे नंदुरबारचे असलेले भारतीय महसूल सेवेतील अधिकारी चंद्रकांत वळवी (Chandrakant Valvi IRS) यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या भागातील तब्बल 620 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केला.
महाबळेश्वरच्या कांदाटी खोऱ्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या परिक्षेत्राला लागून असलेलं झाडाणी या गावाचं या आधीच पुनर्वसन झालं आहे. त्यामुळे सध्या या गावात लोकवस्ती नाही. पण तुमचं पुनर्वसन झालंय, त्यामुळे तुमची जमीन शासन जमा होणार असं सांगत, लोकांना भीती दाखवून केवळ आठ हजार रुपये एकरने ही जमीन संबंधितांनी खरेदी केल्याचा दावा सुशांत मोरे यांनी केला. यासाठी 2000 पूर्वीच दस्त करण्यात आले आहेत, जे ऑफलाईन आहेत.