(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sarpanch | अवघ्या 7 मिनिटांच्या फरकाने हुकले 'सरपंच'पद!
राजकारणात टाईमिंगला किती महत्व असतं आणि अवघ्या काही मिनिटांच्या फरकाने काय अनर्थ घडू शकतो हे चंद्रपूर जिल्ह्यातील उदाहरणाने दाखवून दिलंय.
चंद्रपूर : राज्यात नुकत्याच ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून आता सर्वत्र सरपंच पदावरून गावागावात राजकरण रंगू लागले आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील तारडा ग्रामपंचायतीत अवघ्या 7 मिनिटांच्या फरकाने सरपंच पद हुकल्याचा अजब प्रकार समोर आलाय.
गोंडपिपरी तालुक्यातील तारडा ग्रामपंचायतीत सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक होती. यासाठी परवा म्हणजे सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करायचा होता. 7 सदस्यीय ग्रामपंचायतीत बहुमत असलेला 4 सदस्यीय गट सहलीला गेला होता. मात्र, सरपंच आणि उपसरपंच पदाचा अर्ज दाखल करण्यासाठी ते ग्रामपंचायतीत 12 वाजून 7 मिनिटांनी पोहचले म्हणजे 7 मिनिट उशिरा पोहचले. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज भरू दिला नाही. त्यामुळे 3 सदस्य असलेल्या शिवसेना समर्थक गटाला सरपंच आणि उपसरपंच पद निवडणूक न लढताच आयते मिळाले.
नगरच्या वाळवणे गावात पती-पत्नी झाले सरपंच-उपसरपंच, संसारासोबत गावगाडाही हाकणार!
ग्रामपंचायत निवडणुकीनंतर तारडा ग्रामपंचायतीत भाजप समर्थक पॅनलचे 4 सदस्य निवडून आले. या वेळी सरपंचपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्यामुळे भाजपकडून माया गोंगले यांना सरपंचपद देण्याचे निश्चित झाले. मात्र, एक जरी सदस्य दुसऱ्या गटाकडे गेला असता तर सरपंचपदाचं गणित बिघडलं असतं. त्यामुळे सदस्यांची एकजूट राहावी म्हणून सर्व सदस्यांना निकाल लागताच सहलीसाठी पाठवण्यात आले. ठरल्याप्रमाणे सोमवारी दुपारी 12 पर्यंत हे सर्व सदस्य ग्रामपंचायत कार्यालयात पोहचतील आणि अर्ज सादर करतील असं ठरलं होतं. मात्र, हे सदस्य 12 वाजून 7 मिनिटांनी ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाले. पण, तोपर्यंत अर्ज दाखल करण्याची वेळ निघून गेली होती.
इंदापूर तालुक्यात भाजप-राष्ट्रवादीत ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीवरुन दावे-प्रतिदावे
7 मिनिट उशिर झाल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी माया गोंगले यांना अर्ज भरू दिला नाही. दुसरीकडे 3 सदस्य असलेल्या शिवसेना समर्थक पॅनलकडून तरुण उमरे यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला आणि तो मंजूर देखील झाला. विरोधात एकही अर्ज नसल्यामुळे 3 सदस्य असलेल्या शिवसेना समर्थक गटाला सरपंच आणि उपसरपंच पद निवडणूक न लढताच आयते मिळाले. शिवसेना समर्थक पॅनलकडे अवघे 3 सदस्य असताना देखील तरुण उमरे यांना सरपंचपद मिळालंय. राजकारणात टाईमिंगला किती महत्व असतं आणि अवघ्या काही मिनिटांच्या फरकाने काय अनर्थ घडू शकतो हे या उदाहरणाने दाखवून दिलंय.