Girish Mahajan on Sanjay Raut : पक्षासाठी मी काहीही करेल! संजय राऊतांनी पक्ष फोडणारा 'दलाल' म्हणताच गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर
Girish Mahajan on Sanjay Raut : गिरीश महाजन म्हणजे पक्ष फोडायला नेमलेला दलाल असल्याची जळजळीत टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Girish Mahajan on Sanjay Raut : गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणजे पक्ष फोडायला नेमलेला दलाल आहे. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल, त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल, अशी जळजळीत टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केली. आता गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केलाय.
गिरीश महाजन म्हणाले की, संजय राऊत आपण ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने आपण बडबड केली आहे. ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना आणि त्यांच्या शिवसेनेला शरद पवार साहेबांच्या मांडीवर नेऊन बसवले. काँग्रेसच्या मांडीवर नेऊन बसवले आणि त्यामध्ये एवढी दलाली केली, तेवढी दलाली आजपर्यंत कोणीही केली नसेल. राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली आहे. आज त्यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेले नाही. उद्धवजींनी त्यांना जर आवरले नाही तर पुढे त्यांच्याकडे कोणीही राहणार नाही. सगळी शिवसेना जमीनदोस्त होणार आहे. संजय राऊत मी तर पक्षाचा पाईक आहे. मी 35 वर्षापासून निवडून येत आहे. मी कोण आहे? काय आहे? हे सर्वांना माहित आहे. पक्षासाठी मी काहीही करेल. पक्षवाढीसाठी मी करेल. तुमच्यासारखं पक्षाला रसातळाला नेण्यासाठी मी दलाली करणार नाही, असा पलटवार त्यांनी केलाय.
सगळी शिवसेना तुम्ही संपवली
गिरीश महाजन पुढे म्हणाले की, दलालीचा विषय काढाल तर कोरेगावच्या पत्राचाळीमध्ये आपण काय केले? किती दिवस जेलमध्ये राहिलात? आम्हाला बोलायला लावू नका. बाळासाहेबांच्या विचाराला तुम्ही तिलांजली दिली. उद्धवजींच्या शिवसेनेला खुशाल तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर नेऊन बसवलं. सगळी शिवसेना तुम्ही संपवली आणि तुम्ही काय गप्पा करतात? अजूनही तुमची बडबड बंद झाली नाही तर उद्धवजींचं देव भलं करो, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
अशीच बडबड सुरू राहिली तर...
कोणाला काय संपवायचे आहे? हे आता दिसून येत आहे. त्यांना शिवसेना संपवायची होती. त्यांना उद्धवजींना संपवायचं होतं, म्हणून त्यांनी इतकी अपार मेहनत केली की, पवार साहेबांच्या दावणीला त्यांनी संपूर्ण शिवसेना बांधली. काँग्रेसकडे नेऊन शिवसेनेला संपवलं. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार संपवले. आता अजूनही त्यांची बडबड इतकी सुरू असते की, त्याला काही सीमा राहिलेले नाही. ही अशीच बडबड सुरू राहिली तर शिवसेना शिल्लक राहणार नाही. तुम्ही बघा पुढे काय काय होतं ते, असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.
मी लहानपणापासून संघाचा स्वयंसेवक
ज्या दिवशी सरकार बदलेल, त्या दिवशी गिरीश महाजन सर्वात पहिले पक्ष बदलतील, असा आरोप संजय राऊत यांनी केला. याबाबत विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की, मी लहानपणापासून संघाचा स्वयंसेवक आहे. 35 वर्ष झाले मी भाजपमध्ये सात वेळा निवडून आलेलो आहे. माझ्या मनात असा विचार कधीही आलेला नाही. तुमच्यासारख्यांच्या मनात असे विचार येतात. आम्हाला कुठेही जायची गरज नाही. सत्ता असो की नसो. वीस वर्ष मी पण विरोधात होतो. तेव्हा मला देखील खूप आमिष दाखवले. पण, मी माझ्या विचारातून दूर झालो नाही. आणि आता तर काही प्रश्नच येत नाही, असे प्रत्युत्तर गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना दिले.
आणखी वाचा
























