मंगळसूत्र मोडलं, चार दिवस उपाशी, मुलाच्या उपचारासाठी आई-वडिलांचे थेट मुख्यमंत्र्याकडे साकडं; देवेंद्र फडणवीसांकडून तत्काळ मदत
Gadchiroli News : गडचिरोलीचे पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा संवेदनशीलपणा परत एकदा दिसून आला आहे.

Gadchiroli News : गडचिरोलीचे पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा संवेदनशीलपणा परत एकदा दिसून आला आहे. गडचिरोलीच्या (Gadchiroli News) अतिदुर्गम भागातील सुनील पुंगाटी या सतरा वर्षीय मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्याच्या आई-वडिलांनी दाखल केलं होतं. मात्र आई-वडिलांकडे उपचारासाठी पैसे नसल्याने मुलाच्या आईने मंगळसूत्र विकून एक लाख रुपये रुग्णालयाकडे जमा केले. मात्र उपचारासाठी आणखी रक्कम हवी होती. तसेच त्यांना मुलाची देखभाल करत असताना खाण्यासाठी ही पैसे उपलब्ध नव्हते.
परिणामी, त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मदतीसाठीचे आवाहन केलं होतं. दरम्यान एका मेसेजद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल (1 फेब्रुवारी) रात्री ही माहिती समजल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख असलेले रामेश्वर यांना तात्काळ मोफत उपचारासाठी कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यातून भामरागडच्या त्या अतिदुर्गम भागातील सुनील पुंगाटीवर नागपूरच्या खाजगी रुग्णालयात आता पूर्णपणे मोफत आणि चांगले उपचार सुरू आहेत. तसेच मंगळसूत्र विकून भरलेले एक लाख रुपये ही त्यांना परत मिळणार आहेत. त्यामुळे एका मेसेजवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कारवाई करून त्यांच्यातील संवेदनशीलपणा आणि कारवाईसाठी असलेली तत्परता दाखवून दिली आहे.
भंडारा पोलिसांच्या 'सायबर बॉट' प्रणालीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी भंडारा पोलिसांनी 'सायबर बॉट' प्रणाली तयार केलीय. महाराष्ट्र पोलिसांच्या वतीनं भंडारा पोलिसांनी तयार केलेली ही प्रणाली राज्यातील पहिली प्रणाली असून याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत भंडारा पोलिसांचं अभिनंदन केलं आहे. भंडारा पोलिसांनी सुरू केलेल्या या सायबर बॉट बाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करून हे अभिनंदन केलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी 100 दिवसात कृती आराखडा करून नागरिकांना सुशासन देण्याचं आवाहन केलं होतं, त्यानुसार भंडारा पोलिसांनी पुढाकार घेतं ही सायबर बॉट प्रणाली अस्तित्वात आणली आहे. हॅकर आणि सायबर गुन्हेगारांवर अंकुश लावता येईल, असा दावा भंडारा पोलिसांचा आहे.
सायबर फ्रॉड किंवा मोबाईल सिम हॅक झाल्यावर नागरिकांनी काय करावं, यासाठी भंडारा पोलिसांनी तयार केलेल्या या प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना मदत मिळणार आहे. ७४४७४७०१०० या क्रमांकाचा व्हाट्सअप सायबर बॉट तयार केली असून यावर फसवणूक झालेल्या नागरिकांना हॅलो टाईप करुन तो फॉरवर्ड करायचा आहे. त्यानंतर कुठल्या प्रकारची फसवणूक करण्यात आली त्याचे ऑप्शन्स दिले जाईल, त्यावर क्लिक केल्यानंतर भंडारा पोलिसांकडून तात्काळ मदत मिळणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























