North Central Mumbai : ना भाई जगताप, ना नसीम खान! काँग्रेसकडून उत्तर मध्य मुंबईतून तिसऱ्याच नावाला दिल्लीतून सिग्नल
गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघातील मराठी टक्का लक्षात घेता भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्या उमेदवारी चर्चा सर्वाधिक रंगली होती. मात्र, दिल्लीमधून आता राज बब्बर (Raj Babbar) यांचे नाव पुढं आलं आहे.
मुंबई : मुंबईमधील (Mumbai) सहा लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या उत्तर मध्य मुंबईमधून (North Central Mumbai) काँग्रेसने (Congress) तयारी सुरू केली आहे. या मतदारसंघांमध्ये असलेला मराठी टक्का तसेच सेलिब्रिटींचा भरणा हे समीकरण लक्षात घेता काँग्रेसकडून भाई जगताप, सुरेश शेट्टी, हुसेन दलवाई तसेच नसीम खान यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, आता ही सर्व नावे मागे पडून दिल्लीतील उच्चपदस्थांकडून अभिनेते राज बब्बर यांचं नाव पुढे करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्लीतील उच्चपदस्थांकडून राज बब्बर यांना हिरवा कंदिल
गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघातील मराठी टक्का लक्षात घेता भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्या उमेदवारी चर्चा सर्वाधिक रंगली होती. मात्र, दिल्लीमधून आता राज बब्बर (Raj Babbar) यांचे नाव पुढं आलं आहे. राज बब्बर सध्या याच मतदारसंघांमध्ये राहतात. त्यामुळे या मतदारसंघातील सेलिब्रिटी चेहरा असल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जागा वाटपामध्ये उत्तर मध्य मुंबईची जागा काँग्रेसला सुटल्यात जमा आहे.
मतदारसंघात कोणाचे प्राबल्य?
या विलेपार्ले, चांदीवली. कुर्ला कालिना वांद्रे पूर्व आणि पश्चिम असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामधील वांद्रे पूर्वचे आमदार असलेल्या झिशान सिद्दिकी यांच्याकडून युवक मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद काढून घेण्यात आलं आहे. त्यांच्या वडिलांनी सुद्धा काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. विलेपार्लेमध्ये भाजपचे पराग अळवणी, चांदिवलीचे शिवसेनेचे दिलीप लांडे, कुर्ल्यात मंगेश कुडाळकर, कलिनामधून संजय पोतनिस आमदार आहेत. वांद्रे पश्चिममधून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार आमदार आहेत. या मतदारसंघात युतीचा प्रभाव राहिला आहे.
गेल्या दोन निवडणुकीत महायुतीचा विजय
दुसरीकडे, मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा जागेबाबतची स्थिती स्पष्ट झाली आहे. ही जागा काँग्रेससाठी सोडण्यास महाआघाडी पक्षांनी सहमती दर्शवली आहे. 2014 च्या मोदी लाटेपासून भाजपने या जागेवरून सलग दोन निवडणुका जिंकल्या आहेत. त्यापूर्वी ही जागा काँग्रेसच्या ताब्यात होती. मुस्लिम आणि उत्तर भारतीय बहुल या जागेवर काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांचे लक्ष आहे. सध्या भाजपच्या नेत्या पूनम महाजन येथून खासदार आहेत.
गेल्या दोन निवडणुकांमध्ये महाजन यांच्या जवळच्या प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना यावेळी निवडणूक लढवणार नाहीत. प्रिया यांनी 2009 मध्ये या जागेवरून निवडणूक जिंकली होती. प्रिया दत्त गेल्या तीन निवडणुकांपासून या जागेवरून काँग्रेसच्या उमेदवार आहेत. परंतु, गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रिया राजकारणात पूर्णपणे निष्क्रिय आहेत. यावेळी प्रिया दत्त यांना उमेदवारी मिळणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे या जागेवरून काँग्रेसने नवा चेहरा उतरवण्याची तयारी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या