Jalgaon News: माझ्यामागे ईडी लावली, म्हणून तुझ्यामागे मोक्का लावला; एकनाथ खडसेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
Jalgaon: एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या दोघांमध्ये नेहमीच शाब्दिक खटले उडत असतात. मात्र, यावेळी महाजनांवर टीका करताना एकनाथ खडसेंनी मोठा गौप्यस्फोट केला आणि सरकारचा तपास यंत्रणांवरील दबावच स्पष्ट झाला.
Jalgaon: राष्ट्रवादी काँग्रसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यात वारंवार शाब्दिक चकमक घडत असते. या दोन्ही नेत्यांमध्ये सतत विविध मुद्द्यांवरुन संघर्ष बघायला मिळतात. आता पुन्हा एकनाथ खडसे यांनी राजकारणातील गौप्यस्फोट केला आहे. यातून सत्तेत येणारा पक्ष तपास यंत्रणेचा कसा गैरवापर करतो याची चर्चा सुरू झाली आहे.
'माझ्यामागे ईडी लावली, म्हणून तुझ्यामागे मोक्का लावला'
गिरीश महाजन यांनी माझ्यामागे सर्व यंत्रणा लावल्या, ईडी चौकशी लावली. माझी सीबीआय चौकशी सुरु केली आणि उलट मला विचारतो की माझ्यामागे मोक्का का लावला? तू माझ्यामागे ईडी लावली, म्हणून तुझ्यामागे मी मोक्का लावला, असं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलं आहे. खडसेंच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.
सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर तपास यंत्रणांचा फेरा
राज्यातील राजकारणात सरकारच्या विरुद्ध जो बोलतो त्याच्या विरोधात ईडी लावली जाते. त्याच्याविरोधात सीबीआय आणि इतर सरकारी यंत्रणांचा वापर करून दबाव आणला जातो, असा आरोप एकनथ खडसे यांनी केला आहे. मंत्री गिरीश महाजन यांचा एकेरी उल्लेख करत गिरीशने तर माझ्यामागे सर्व यंत्रणा लावल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारमध्ये असताना एवढा माज येणं बरोबर नाही, हा माज फार काळ टिकत नाही, असं म्हणत खडसेंनी महाजन यांना सुनावलं आहे.
एकनाथ खडसेंना मालमत्ता जप्तीची नोटीस
आता तर न्यायालयाने आपल्याला मालमत्ता जप्तीची नोटीस दिली असल्याचं यावेळी एकनाथ खडसे यांनी सांगितलं.
...नाहीतर पेन्शनवर जगला असता, गिरीश महाजनांवर कडाडून टीका
गिरीश महाजन यांना आम्हीच मोठे केलं हे संपूर्ण जामनेर तालुक्याला माहीत आहे. गिरीश महाजन एका चांगल्या शिक्षकाचा मुलगा आहे, म्हणून त्यांना आम्ही वर आणण्याचा प्रयत्न केला, नाहीतर गिरीश महाजन वडिलांच्या पेन्शनवरच जगले असते, असंही खडसे म्हणाले.
'त्या प्रकरणात माझ्यामुळेच गिरीश महाजन वाचले'
मी आलो म्हणून फर्दापूरच्या एका प्रकरणात गिरीश महाजन वाचले नाहीतर... त्यावेळी कोणत्या अवस्थेत गिरीश महाजन होते, ती महिला कोणत्या अवस्थेत होती, ते मी पाहिले होते. पोलीस निरीक्षकाने महाजन यांच्या कानाखाली वाजवली होती. मी होतो म्हणूनच वाचले, मात्र माझीच मोठी चूक झाली. त्यावेळेस सोडलं नसतं तर आज आतमध्ये असते, असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलं आहे.