माढ्याचा तिढा सुटेना, भाजपच्या अडचणी संपेना, उमेदवारीसाठी देवेंद्र फडणवीसांना रक्तानं पत्र
Madha Lok Sabha constituency : धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी द्या , धोंडेवडी येथील तरुणाने रक्ताने लिहिले फडणवीस याना पत्र
Dhairyashil Mohite Patil, Madha Lok Sabha constituency : महायुतीकडून माढा लोकसभेसाठी विद्यमान खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनाच पुन्हा तिकिट देण्यात आले. या उमेदवारीला स्थानिक नेतृत्वाकडून विरोध झाला. अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील हेही खासदारकीसाठी इच्छूक आहेत. त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत शक्तीप्रदर्शनही केले. धैर्यशील मोहिते पाटलांची समजूत काढण्याचा भाजपकडून सर्वोत्परी प्रयत्न केले जात आहेत. पण धैर्यशील मोहिते पाटील भूमिकेवर ठाम असल्याचं दिसतेय. धैर्यशील मोहित पाटील यांच्या समर्थकांकडूनही उमेदवारीसाठी भाजप नेत्यांना विचारणा कऱण्यात येत आहे. मागील काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन अकलूजमध्ये आले होते, त्यावेळी कार्यकर्त्यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना तिकिट द्या. निंबाळकर यांची उमेदवारी बदला... अशी मागणी कऱण्यात आली होती. त्याशिवाय काही कार्यकर्त्यांच्या मते, भाजपने उमेदवारी दिली नाही, तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची तुतारी हातात घ्यावी.. अशी मागणी केली. माढ्यातील राजकारण तापलं असतानाच एका कार्यकर्त्यानं देवेंद्र फडणवीस यांना रक्तानं पत्र लिहिले आहे. धोंडेवाडी येथील महेश लोखंडे यांनी मोहिते पाटलांसाठी रक्तानं पत्र लिहिले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर एका मोहिते पाटील समर्थकाने थेट रक्ताने देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. मोहिते पाटील समर्थक रणजीतसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीने नाराज झाले आहेत. त्यांनी तुतारी हातात घेऊन निवडणूक रिंगणात उतरावे असे प्रयत्न सुरू झाले आहेत. असं असलं तरी भाजपकडून निंबाळकर हेच उमेदवार राहतील अशा पद्धतीचे चित्र स्पष्ट झालं. आता पंढरपूर तालुक्याच्या धोंडेवाडी येथील महेश लोखंडे या तरुणाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्ताने पत्र लिहीत खासदार रणजितसिंह निंबाळकर हे लोकांच्या संपर्कात नसतात; ते निवडून येऊ शकत नाहीत त्यामुळे निंबाळकरांची उमेदवारी रद्द करून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी, असं पत्र स्वतःच्या रक्ताने लिहिलेलं आहे.
धोंडेवाडी येथील महेश लोखंडे या तरुणाची सध्या पंढरपूर आणि परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे. महेश लोखंडे हे कट्टर भाजप कार्यकर्ता आहे. त्यांनी आतापर्यंत भाजपसाठी जिवाचं रान केले. महेश लोखंडे यांच्या मते, माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवावी.
भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी
भाजपकडून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. 2019 निवडून आल्यानंतर संपर्क ठेवला नसल्याने निंबाळकरांवर माढातील मोठा वर्ग नाराज आहे. दरम्यान अशातच मोहिते पाटील यांच्या घरातील उमेदवार दिल्यास भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो, असे बोलले जात आहे.