Sangli News: हात पकडून कानात कुजबूज ; सांगलीत देवेंद्र फडणवीस-संभाजी भिडेंची भेट
Maharashtra Politics: सांगली लोकसभेत संजयकाका पाटील आणि विशाल पाटील विरुद्ध चंद्रहार पाटील अशी लढाई रंगण्याची शक्यता आहे. सांगलीत फडणवीसांनी घेतली संजयकाका पाटलांच्या प्रचारासाठी सभा. संजयकाका तिसऱ्यांदा निवडून येण्याची खात्री
सांगली: आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सध्या देवेंद्र फडणवीस हे राज्यभरात अनेक भेटीगाठी घेत आहेत. याचाच एक भाग म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे उर्फ भिडे गुरुजींची (Sambhaji Bhide) भेट घेतली. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
सांगलीच्या दौऱ्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे हेलिकॉप्टराने कवलापूर विमानतळावर दाखल झाले. यावेळी विमानतळावर संभाजी भिडे उपस्थित होते. फडणवीस हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर संभाजी भिडे त्यांना भेटले. यानंतर संभाजी भिडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काहीवेळ चर्चा झाली. संभाजी भिडे हे देवेंद्र फडणवीस यांचा हात धरून त्यांना काहीतरी सांगत होते. यानंतर देवेंद्र फडणवीस किंचित खाली झुकले आणि संभाजी भिडे यांनी त्यांच्या कानात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही. सांगली लोकसभेच्यादृष्टीने या दोघांमध्ये काही चर्चा झाली असावी का, याबाबत सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
सांगलीत संजयकाका पाटलांची हॅटट्रिक पक्की: देवेंद्र फडणवीस
सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी संजयकाका पाटील यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. अर्ज भरल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीत संजयकाका पाटील यांची हॅटट्रिक पक्की असल्याचे म्हटले. विरोधकांमध्ये सगळी इंजिनं आहेत, आमच्याकडे सगळे डबे आहेत. इंजिनांमध्ये ताळमेळ नसल्याने ती हलत नाहीत. संजयकाका पाटील यांचा विजय पक्का आहे, आता ते किती मोठ्या मताधिक्याने विजय मिळवतात, हे बघायचं आहे. पुढील पाच वर्षे कोणाच्या हातात देश द्यायचा,यासाठी ही निवडणूक आहे. संजय काका मोदींच्या इंजिनच्या डब्यासोबत सर्वांना दिल्लीला घेऊन चालले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
आणखी वाचा
बारामतीत इतिहास घडेल, सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील; देवेंद्र फडणवीस