Devendra Fadanvis Interview: 'ती' जाहिरात काही कमी बुद्धीच्या लोकांनी दिली होती, शिंदेंनी चूक मान्य केली; देवेंद्र फडणवीसांचा इशारा कुणाकडे?
Devendra Fadanvis : त्या जाहिरातीबद्दल भाजपच्या काही कार्यकर्त्यांमध्ये राग होता, पण शिंदेंनी चूक मान्य केल्यानंतर तो विषय माझ्यासाठी संपला असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई: मुख्यमंत्री शिंदे हेच राज्यातील सर्वात लोकप्रिय असल्याची जाहिरात काही दिवसांपूर्वी प्रमुख वर्तमानपत्रात प्रकाशित झाली होती. त्यावर आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केलं आहे. ती जाहिरात काही कमी बुद्धीच्या लोकांनी दिली होती, दुसऱ्या दिवशी शिंदे यांनी चूक मान्य केली असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत (Devendra Fadanvis Interview) हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ते कमी बुद्धीची लोक कोण? देवेंद्र फडणवीसांचा इशारा कुणाकडे आहे? फडणवीसांच्या मनात चाललंय तरी काय? असे अनेक सवाल राजकीय वर्तुळात विचारले जात आहेत.
"शिवसेनेच्या नावावर देण्यात आलेल्या जाहिरातीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रत्येक पक्षात काही लोक हे कमी बुद्धीचे असतात. ती जाहिरातही कमी बुद्धीच्या लोकांनी दिली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चूक मान्य केली. त्यानंतर तो विषय माझ्यासाठी संपला. पण भाजपच्या काही कार्यकर्त्यांमध्ये त्याबद्दल राग होता, पण तो राग स्वाभाविक होता."
Devendra Fadanvis On Eknath Shinde: शिंदेंना मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मीच प्रयत्न केले
एकनाथ शिंदे जर एवढा मोठा निर्णय घेत असतील तर त्यांनाच मुख्यमंत्री करावं असं मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलं आणि त्यासाठी त्यांना तयार केलं. त्यावेळी सरकारमध्ये मी सहभागी होणार नाही, राज्यभर पक्षाचा विस्तार करेन असं सांगितलं होतं. पण माझ्या अनुभवाचा सरकारला फायदा होईल आणि सरकार टिकेल असं वरिष्ठांना वाटलं आणि मी सरकारमध्ये सहभागी झालो. मुख्यमंत्री असताना ज्या गोष्टी मी करु शकलो नाही त्याहून चांगल्या अनेक गोष्टी मी उपमुख्यमंत्री असताना केल्या याचं मला समाधान आहे.
13 जून रोजी राज्यातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रात एक शिवसेनेच्या नावे एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये एकनाथ शिंदे हेच सर्वाधिक लोकप्रिय (Shivsena Survey Advertise On Popular CM) असून त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा नंबर लागतोय असा दावा करण्यात आला होता. त्या जाहिरातीवर फक्त एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो होता. राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे या टॅगलाईनने ती जाहिरात प्रसिद्ध झाली होती.
या जाहिरातीनंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नाही याची चर्चा सुरू झाली. त्या दिवशी राज्यातील सर्वच प्रमुख नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदे यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची लोकप्रियता असल्याचं सांगितलं होतं. भाजप नेत्यांनी यावर टीका केली होती तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा नवीन जाहिरात देण्यात आली आणि त्यावर शिंदे फडणवीस सरकार लोकप्रिय असल्याचं सांगत सारवासारव करण्यात आली.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
