(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dasara Melava : यंदाच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मोकळेच राहणार?
Dasara Melava : यंदाच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मोकळेच राहण्याची शक्यता आहे. वादग्रस्त मुद्द्यामुळे शांतता सुव्यवस्थेचे कारण पुढे करत मुंबई महापालिका शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटांच्या अर्जाला नकार देण्याची शक्यता आहे.
Dasara Melava : मुंबईतील (Mumbai) दादरच्या शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा उद्धव ठाकरे (Uddhava Thackeray) यांचा होणार की शिंदे गट (Shinde Group), यावरुन वाद सुरु असतानाच यंदाच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मोकळेच राहण्याची शक्यता आहे. वादग्रस्त मुद्द्यामुळे शांतता सुव्यवस्थेचे कारण पुढे करत मुंबई महापालिका शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटांच्या अर्जाला नकार देण्याची शक्यता आहे.
शिवसेना कुणाची हा न्यायप्रविष्ट असणारा वाद, तसंच सध्याची दादर प्रभादेवीमधील तणावाची स्थिती यांमुळे शांतता सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची भीती असल्याने कोणत्याही गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी देऊ नये असे मत मुंबई महापालिका अधिकाऱ्यांच्या वर्तुळात व्यक्त केले जात आहे
सध्या दादर प्रभादेवी भागात दोन्ही गटांच्या वादांमुळे आधीच तणाव वाढलाय, अशा स्थितीत दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याकरता दोन्ही गटांनी अर्ज दिले आहेत. मात्र, खरी शिवसेना कुणाची हा वाद न्यायप्रविष्ट असताना, कोणाच्याही अर्जावर निर्णय घेणे पालिका प्रशासनाला कठीण जाऊ शकते. त्यामुळे मुंबई पोलिसांशीही सल्लामसलत करुन शांतता सुव्यवस्थेच्या कारणास्तव महापालिका दोन्ही गटांना शिवाजी पार्क मैदानाची परवानगी नाकारु शकते. महापालिकेने अद्याप यावर अंतिम निर्णय घेतलेला नसून, सध्या जी नॉर्थ वॉर्ड प्रशासन याबाबत विधी खात्याचा सल्ला घेत आहे.
महापालिका प्रशासनापुढे पेच
शिवतीर्थावर अर्थात दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाने मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाकडे परवानगीसाठी अर्ज केला आहे. दोन्ही गट शिवतीर्थासाठी आग्रही आहेत. महापालिकेकडून दोन्ही गटांच्या अर्जाची छाननी सुरु आहे. परंतु नेमकी कोणाला परवानगी द्यावी याबाबत महापालिका प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळेच आता दसरा मेळाव्याप्रकरणी महापालिका प्रशासन आपल्या विधी विभागाचा सल्ला घेण्याच्या विचारात आहे. भविष्यात हे प्रकरण न्यायालयात गेल्यास आपली बाजू सुरक्षित राहावी यादृष्टीने महापालिका प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे.
दादरमध्ये महापालिकेच्या जी नॉर्थ कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त
दादर इथे होणाऱ्या दसरा मेळाव्यावरुन सध्या शिवसेना आणि शिंदे गट यामध्ये जुंपली आहे. शिवतीर्थावर परवानगी मिळावी यासाठी प्रशासनावर दोन्ही बाजूने दबाव निर्माण झाला आहे दादर इथल्या जी नॅार्थ या महापालिकेच्या कार्यालयाबाहेर राजकीय राडा होण्याची शक्यता लक्षात घेऊन इथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परवानगी मिळेपर्यंत जी नॅार्थ ॲाफिसच्या बाहेर मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.