Akola Loksabha: मोठी बातमी: अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांविरोधात उमेदवार रिंगणात उतरवलाच
Maharashtra Politics: आज सकाळपर्यंत काँग्रेस पक्ष अकोल्यातून प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात उमेदवार देणार नाही, अशी चर्चा होती. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला कोणत्याही 7 जागांवर पाठिंबा दर्शवण्याची तयारी दाखवली होती.
अकोला: प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूर आणि नागपूर या दोन लोकसबा मतदारसंघांमध्ये पाठिंबा दिल्याच्या मोबदल्यात त्यांच्याविरोधात काँग्रेस पक्षाकडून अकोल्यात उमेदवार दिला जाणार नाही, या चर्चेला अखेर विराम मिळाला आहे. कारण, काँग्रेस पक्षाकडून सोमवारी रात्री प्रसिद्ध करण्यात आलेल्या लोकसभा उमेदवारांच्या यादीत अकोल्याचा (Akola Loksabha) समावेश आहे. काँग्रेसने अकोल्यातून डॉ. अभय काशिनाथ पाटील (Abhay Patil) यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे आता अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे वि. वंचितचे प्रकाश आंबेडकर वि. काँग्रेसचे अभय पाटील यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याविरोधात अकोल्यातून उमेदवार दिल्याने वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये याविषयी प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
आज सकाळपर्यंत काँग्रेस पक्ष अकोल्यातून प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात उमेदवार देणार नाही, अशी चर्चा होती. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला कोणत्याही 7 जागांवर पाठिंबा दर्शवण्याची तयारी दाखवली होती. त्याची परतफेड म्हणून काँग्रेस पक्ष अकोल्यातून त्यांच्याविरोधात उमेदवार देणार नाही, असा अंदाज होता. प्रकाश आंबेडकर यांनी आपण अकोल्यात काँग्रेसचा पाठिंबा मागितला नसल्याचे अगोदरच स्पष्ट केले होते. परंतु, महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी हायकमांडकडे केली होती. परंतु, हायकमांडने ही मागणी मान्य केली नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता अकोल्याच्या रिंगणात प्रकाश आंबेडकर विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगताना पाहायला मिळेल.
Congress releases a list of candidates for the upcoming Lok Sabha Elections.
— ANI (@ANI) April 1, 2024
Abhay Kashinath Patil to contest from Akola, Maharashtra and Kadiyam Kavya to contest from Warangal, Telangana. pic.twitter.com/34hMDeg3ia
अकोल्यात काँग्रेसचा ट्रॅक रेकॉर्ड निराशाजनक
काही दिवसांपूर्वीच डॉ. अभय पाटील यांनी आपल्याला अकोल्यातून काँग्रेसची उमेदवारी मिळणार असल्याचे वक्तव्य केले होते. आपण 4 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. परंतु, काँग्रेसकडून अकोल्याचा उमेदवार जाहीर केला जाणार की नाही, याबाबत साशंकता कायम होती. परंतु, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून डॉ. अभय पाटील यांचा प्रचार सुरू केला होता.
काँग्रेस पक्षाने अकोल्यातून अभय पाटील यांना रिंगणात उतरवले असले तरी या मतदारसंघातील काँग्रेसची गेल्या काही वर्षांतील कामगिरी फारच निराशाजनक आहे. 1989 सालापर्यंत अकोला मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 1984 साली मधुसूदन वैराळे यांच्या रूपाने या मतदारसंघात काँग्रेसला शेवटचा विजय मिळाला होता. त्यानंतर काँग्रेसला एकाही निवडणुकीत अकोल्यात विजय मिळालेला नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत डॉ. अभय पाटील हे भाजपच्या अनुप धोत्रे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर आव्हान निर्माण करण्यात यशस्वी ठरतात का, हे पाहावे लागेल.
आणखी वाचा