Congress: प्रियंका गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक, 50Under50 चा निर्णय कार्यसमितीपासून खालच्या स्तरापर्यंत लागू होणार
Chintan Shivir Decision: आज दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या सर्व सरचिटणीस आणि प्रभारींची महत्त्वपूर्ण बैठक प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत झाली.

Chintan Shivir Decision: उदयपूर येथील काँग्रेसच्या नवसंकल्प चिंतन शिबिरात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांच्या अंमलबजावणीसंदर्भात आज दिल्लीत पक्षाच्या सर्व सरचिटणीस आणि प्रभारींची महत्त्वपूर्ण बैठक प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीनंतर पक्षाचे सरचिटणीस अजय माकन म्हणाले की, ''चिंतन शिबिर'मध्ये घेतलेला प्रत्येक निर्णय हा नवा ठराव नसून पक्षासाठीचा निर्धार आहे. प्रत्येक निर्णयाची पूर्ण अंमलबजावणी केली जाईल.''
एक व्यक्ती एक पद
बैठकीनंतर काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन म्हणाले की, काँग्रेस कार्यकारिणीपासून खालच्या स्तरापर्यंत संघटनेच्या प्रत्येक स्तरावर तरुणांना 50 टक्के जागा देण्याचा निर्णय लवकरात लवकर लागू केला जाईल. एवढेच नव्हे तर पक्षाचे नेते लवकरच राज्याच्या दौऱ्यावर जाणार असून, 5 वर्षांहून अधिक काळ एकाच पदावर बसलेल्या अशा नेत्यांची ओळख पटवून त्यांना लवकरात लवकर पदमुक्त करण्यात येईल, असा निर्णयही घेण्यात आला. एक व्यक्ती एक पद, या निर्णयानुसार दोन पदे असलेल्या अशा सर्व लोकांची ओळख पटवून त्यावरही कारवाई केली जाईल.
संस्थेतील सर्व रिक्त पदेही लवकरात लवकर भरण्यात येतील, असेही माकन यांनी जाहीर केले. भाजपच्या राजकारणाचा सामना करण्यासाठी काँग्रेस भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस सर्वाना एकत्र आणण्याचं काम करेल, असेही माकन यांनी सांगितले. एवढेच नाही तर स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या स्मरणार्थ 9 ऑक्टोबरपासून पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
नेत्यांच्या कामाचे मूल्यमापन होईल
आजच्या बैठकीनंतर पक्षाच्या सरचिटणीसांसह सर्व पदाधिकाऱ्यांच्या कामाचे मुल्यांकन करून योग्य ती कारवाई केली जाईल, असेही जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर काँग्रेस आपल्या संपर्क विभागाची नव्याने फेररचना करणार असून सोशल मीडिया आणि विचार विभागही संपर्क विभागाच्या अखत्यारीत येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. एवढेच नाही तर राज्यांचे कम्युनिकेशन सरचिटणीसही राष्ट्रीय कम्युनिकेशन सरचिटणीस यांच्याशी चर्चा करून निवडले जातील.
दरम्यान, या सर्व निर्णयामागील कारण काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, काँग्रेस नेतृत्व आणि संपूर्ण पक्षाला आता कळलं आहे की, हे महत्वाचे बदल आता लागू केले नाहीत, तर काँग्रेस नामशेष होईल. बुधवारी दिल्लीत काँग्रेस सरचिटणीस आणि प्रभारींची बैठकही होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
