मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या चार खासदारांना धक्का! हेमंत पाटील, भावना गवळींचा पत्ता कट, आता हेमंत गोडसे आणि धैर्यशील मानेंचं काय होणार?
भाजपने एकनाथ शिंदेंच्या पाच विद्यमान खासदारांना विरोध केला होता. रामटेकच्या कृपाल तुमाने यांचे तिकीट आधीच कापण्यात आलं आहे, तर आता हेमंत पाटील आणि भावना गवळींचंही तिकीट कापण्यात आलं.
मुंबई : महायुतीतील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारीवरून राज्याच्या राजकारणात आता मोठं महाभारत घडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर तर केली, पण त्यावरून आता वाद होताना दिसत आहे. हिंगोलीचे हेमंत पाटील (Hemant Patil) आणि यवतमाळच्या भावना गवळींचा पत्ता कट करण्यात आला आहे. हिंगोलीमधून हेमंत पाटलांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असूनही त्यांची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की आली आहे. त्या ठिकाणी बाबुराव कदम कोहळीकर यांना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे आता नाशिकच्या हेमंत गोडसे आणि हातकणंगल्याच्या धैर्यशील मानेंचं काय होणार याची चर्चा सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 28 मार्च रोजी त्यांची उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामधील हेमंत पाटील आणि भावना गवळी यांच्या नावाला भाजपचा असलेला विरोध लक्षात घेता त्यांची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की ओढावली आहे.
हेमंत पाटील आणि धैर्यशील मानेंना विरोध
जाहीर करण्यात आलेल्या आठपैकी सात खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली होती. त्यामध्ये रामटेकच्या कृपाल तुमाने यांची उमेदवारी या आधीच कापण्यात आली आहे. तर लोकांच्या असलेल्या नाराजीच्या अहवालाचा संदर्भ देत हिंगोलीतील हेमंत पाटील आणि हातकणंगल्यातील धैर्यशील मानेंच्या उमेदवारीला भाजपने विरोध केला होता.
निवेदिता माने आणि राजश्री पाटलांना संधी
धैर्यशील माने यांच्या जागेवर त्यांच्या आई निवेदिता माने यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घेऊन त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यवतमाळच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचे तिकीट आपोआप कापण्यात आलं आहे. भावना गवळी या यवतमाळमधून पाच वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.
कृपाल तुमाने यांचे तिकीट कापलं
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत 13 खासदार आले होते. त्यामधीलच भावना गवळी, हेमंत पाटील यांची उमेदवारी कापण्यात आली आहे. तर धैर्यशील माने, हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे. रामटेकच्या कृपाल तुमाने यांची उमेदवारी या आधीच कापण्यात आली आहे.
गजानन किर्तीकरांना तिकीट नाही
वायव्य मुंबईचे खासदार गजानन किर्तीकर यांनी वयाचं कारण देत निवडणूक न लढण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या ठिकाणी अभिनेता गोविंदाला संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. वायव्य मुंबईतून ठाकरे गटाकडून गजानन किर्तीकर याचे सुपुत्र अमोल किर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हेमंत गोडसेंना संधी नाहीच?
भावना गवळींचं तिकीट कापल्यानतंर आता नाशिकच्या हेमंत गोडसेंचंही तिकीट कापण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यावरही लवकरच निर्णय होईल अशी माहिती आहे.
अडचणीच्या काळात ठाकरेंची साथ सोडून आपण तुमच्यासोबत आलो, पण आता उमेदवारीसाठीही झगडावं लागतंय अशी भावना सध्या या खासदारांची आहे. त्यामुळे ज्यांच्या नावावर भाजपकडून फुली मारण्यात आली आहे ते विद्यमान खासदार एकनाथ शिंदेंवर नाराज असल्याचं चित्र आहे.
ही बातमी वाचा :